लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी आणि रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्यात येतात. मात्र, यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांची आरटीपीसीआर चाचणी किंवा लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक केल्याने कोकण रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन म्हणाले की कोकणवासीयांचे गणपती हे आराध्य दैवत आहे. चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदाही जाणार आहेत. राज्यात कोरोना रुग्ण कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एक दोन महिन्यांपूर्वी विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग करण्यात आले आहे. यंदा विशेष रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केली आहे. असे असताना आता आरटीपीसीआर चाचणी किंवा दोन डोसची अट घालण्यात आली आहे, हे चुकीचे आहे.
---
रेल्वे राज्यमंत्र्यांनी प्रवाशांचे विघ्न दूर करावे
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा जास्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी किंवा दोन डोसची अट घालण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांनीच पुढाकार घेऊन प्रवाशांचे हे विघ्न दूर करावे
मधु कोटियन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
-----
कोरोना रुग्ण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथिल केले आहेत. आता सर्व सुरळीतपणे सुरू आहे. राज्यात राजकीय पक्षांची आंदोलने, जनआशीर्वाद यात्रा होत आहेत त्या ठिकाणी गर्दी होत आहे. मग कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना का त्रास दिला जात आहे?
संदीप परब ,प्रवासी
---
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी किंवा दोन डोसची अट हा अन्याय आहे. राज्याबाहेरून मुंबईत दररोज ३.५ लाख लोक येतात. पण त्यांची चाचणी होत नाही कोकणवासीयांची का चाचणी केली जात आहे. केवळ कोकणवासीयांमुळे कोरोना पसरतो का?
शांताराम नाईक , प्रवासी
---
कोकणात पूर आला होता तेव्हा मदतीसाठी अनेक लोक गेले होते. तेव्हा आरटीपीसीआर चाचणी किंवा दोन डोसची अट नव्हती. मात्र, आता गणेशोत्सव साजरा करण्यास जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास दिला जात आहे. कोकणात राजकीय नेत्यांच्या रॅलीला मास्कविना कार्यकर्ते जातात. कोरोना नियमांचे कोणी पालन करत नाही. असे असताना सामान्य नागरिकांवर बंधने का लादली जातात?
शैलेश दळवी, प्रवासी
____-
रेल्वे प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी किंवा दोन डोसची अट नाही. कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणी किंवा दोन डोसच्या अटीबाबत कल्पना नाही. त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल.
वरिष्ठ अधिकारी, कोकण रेल्वे