'वन स्टेशन, वन प्रॉडक्ट' योजनेतील स्टॉलची बुकिंग फुल्ल; आतापर्यंत २,४०० जणांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 12:14 IST2024-12-17T12:14:36+5:302024-12-17T12:14:49+5:30
जून २०२५ पर्यंत नोंदणी

'वन स्टेशन, वन प्रॉडक्ट' योजनेतील स्टॉलची बुकिंग फुल्ल; आतापर्यंत २,४०० जणांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वेने विविध स्थानकांवर 'वन स्टेशन, वन प्रॉडक्ट' योजना सुरू केली असून आतापर्यंत २४०० पेक्षा अधिक जणांनी त्याचा लाभ घेतला. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि समाजातील मागास घटकांना स्वावलंबी बनवणे, हा या योजनेचा उद्देश असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेत १५ दिवसांसाठी १००० रुपये भाडे आकारून स्टॉलच्या सुविधेसह मोफत २० युनिट वीज लाभार्थ्याला दिली जाते.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ४८ स्थानकांवर 'वन स्टेशन, वन प्रॉडक्ट' योजेनेचे ५९ स्टॉल आहेत. त्यात मुंबईतील ३८ स्थानकांचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू झालेल्या या योजनेला चर्चगेट, अंधेरी, बोरिवली स्थानकांवर सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. त्यातही चर्चगेट स्थानकावरील स्टॉल जून २०२५ पर्यंत, तर मुंबई सेंट्रल येथील स्टॉलची मार्च २०२५ पर्यंत बुकिंग फुल्ल झाले आहे.
मध्य रेल्वेच्या ८१ स्थानकांवर एकूण ८१ स्टॉल असून त्यातील सीएसएमटी, दादर, चेंबूर, मुलुंड, ठाणे डोंबिवली, ऐरोली, कल्याण, कर्जत व इगतपुरी स्थानकांवर या स्टॉलना सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आणि कसे अर्ज करू शकतात?
हातमाग, हस्तकला विकास आयुक्त किंवा आवश्यक राज्य/केंद्र सरकार प्राधिकरण, बचतगट (महिला), खादी ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्याद्वारे जारी केलेले कारागीर/विणकर ओळखपत्र धारक 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट'चे लाभार्थी होऊ शकतात. मंत्रालय, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि महिला आणि बालविकास विभागाचे मान्यताप्राप्त गट यांच्या नोंदणीकृत उत्पादन असलेल्या व्यक्तींना अर्ज करता येईल.
या उत्पादनांना मागणी जास्त आहे
योजनेंतर्गत चामड्याची उत्पादने, अगरबत्ती, खादीचे कपडे, फळे आणि घरगुती मसाल्यांना सर्वाधिक मागणी होती. चर्चगेट, बोरिवली स्थानकात सर्वाधिक चामड्याच्या उत्पादनांची विक्री होते. तसेच गणपती उत्सवात चर्चगेट, दादर, अंधेरी आणि बोरिवली स्थानकांवर इको फ्रेंडली मखरांची विक्री अधिक होती.
पूर्वी आम्ही उत्पादने घरी बनवायचो आणि घाऊक बाजारात विकायचो. पूर्वी आम्हाला प्रति उत्पादन २० ते ३० रुपये मिळायचे. पण आता 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' योजनेमुळे जीवन बदलले आहे. आता उत्पादनामागे १५० ते २०० रुपये मिळतात. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती बरीच सुधारली आहे. आता आम्ही थेट ग्राहकांना भेटून त्यांच्या मागणीचाही विचार करू लागलो आहोत. - दत्तू कांबळे, लेदर उत्पादन विक्रेता, चर्चगेट स्टेशन