Join us

‘पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर नाही’ - शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 2:12 AM

विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवडलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकांमध्ये कुठलाही अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधक आरोप करत आहेत.तरीही आणखी एका समितीला हे पुस्तक दाखवू, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

मुंबई : विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवडलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकांमध्ये कुठलाही अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधक आरोप करत आहेत.तरीही आणखी एका समितीला हे पुस्तक दाखवू, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी ज्यादा दराने करण्यात आलेली पुस्तक खरेदी आणि पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराच्या पार्श्वभूमीवर मंत्री तावडे यांनी माहिती दिली. अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकांची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्याप या पुस्तकांचे वितरण झाले नाही. महाराष्ट्र विद्या प्राधिकारणाने नेमलेल्या आशय समितीने ही निवड केली आहे. आक्षेपार्ह मजकूर आणि किमतीबाबत विरोधकांकडून जे पुस्तक दाखविण्यात येत आहे ते जुने असून कुंभमेळ्यात वाटण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकात असा मजकूर नाही. जास्त किमतीने पुस्तके छापल्याच्या आरोपात तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अवांतर वाचनासाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुस्तके सर्वाधिक असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके निवडण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले़

टॅग्स :विनोद तावडे