मुंबई : कोरोनाशी दोन हात करताना गेले दीड-दोन वर्ष सर्वत्र बंदसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यातून अगदी शाळा, कॉलेजही सुटली नाहीत. अशावेळी मुलांमध्ये आलेले नैराश्य दूर करण्यासाठी गिरणगावात कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई या संघटनेद्वारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गिरणगावातील पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार वह्या, पेन्सिल-पेन यांचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम मुंबई महापौरांच्या निवासस्थानी पार पडला. कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडे व दीपक बागवे यांचे हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई, कार्याध्यक्ष राजू येरुडकर, खजिनदार विनायक आसबे यांच्यासह बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर, जीवन भोसले, चिटणीस बाळा पवार, हेमंत मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरणगावात सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असल्याबद्दल व कोरोनाच्या काळातही संवेदनशीलता जपलेल्या प्रतिष्ठानच्या कार्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. विद्यार्थ्यांना केलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल तसेच वृत्तपत्राची विश्वासार्हता व वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा वह्यांवरील संदेश यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला राजन कोतवडेकर, बिपीन, सतीश पाटील, बापू कोंदाळकर, संतोष वर्टेकर, संजय कुंभार व शैलेश मगदूम यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता प्रतिष्ठानचे सचिव कृष्णा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.