बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:11 AM2019-05-02T05:11:30+5:302019-05-02T05:12:09+5:30
संजय राऊत यांचे समर्थन; पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा प्रवक्त्यांकडून खुलासा
मुंबई : श्रीलंकेच्या धर्तीवर भारतातही बुरखा बंदी करा, अशी मागणी करणाऱ्या दैनिक ‘सामना’च्या बुधवारच्या अग्रलेखावरून शिवसेनेतच जुंपली आहे. अग्रलेखातून करण्यात आलेली बुरखाबंदीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तर, बुरखाबंदीची शिवसेनेची भूमिका नवीन नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा ती ठामपणे मांडली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे बुरखा बंदीवर शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन सरकारने बुरखा व नकाब बंदी केली. रावणाच्या लंकेत घडले ते रामाच्या अयोध्येत घडेल काय, असा सवाल करत सामनाच्या अग्रलेखातून बुरखा बंदीची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या या भूमिकेला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. तर, शिवसेनेच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर त्यावर शिक्कामोर्तब होते. आजची ‘सामना’तील भूमिका कुठल्याही चर्चेतून वा आदेशातून आलेली नाही. त्यामुळे ते चालू घडामोडींवरचे वैयक्तिक मत असेल. पक्षाची अधिकृत भूमिका नाही,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
नीलम गोऱ्हे यांनी ही भूमिका मांडताच संजय राऊत यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली. शिवसेनेच्या भूमिकेमुळे ओवेसींनी इतके लाल-हिरवे होण्याची गरज नाही. बुरखा बंदीच्या शिवसेनेच्या भूमिकेत नवीन काहीच नाही. खुद्द शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हीच भूमिका ठामपणे मांडली आहे. महिला नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दु:ख समजून घ्यावे, अशा शब्दांत राऊत यांनी गोऱ्हे यांचे नाव न घेता सुनावले.
शिवसेनेच्या अनेक भूमिका मुखपत्रातूनच मांडल्या जातात. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी नेमके कुणाच्या सांगण्यावरून अग्रलेखाच्या विरोधात भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना तसा आदेश दिला का? अशी चर्चा रंगली आहे.
‘उद्या तुम्ही आमच्या दाढी, टोपीलाही आक्षेप घ्याल’
बुरखाबंदीच्या या मागणीला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला आहे. निवडीचा अधिकार हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही हिंदुत्व सर्वांवर थोपवू शकत नाही. उद्या तुम्ही आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल. कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला आहे. वैयक्तिक गोपनीयता हा देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे बुरखा घालण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही. बुरखाबंदी करणे घटनाविरोधी आहे. हिंदुत्ववादी शक्तींना राज्यघटना नको आहे. शिवसेना त्यातीलच एक पोपट आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांनी कधी बुरखा घातला होता का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.