बाळासाहेब थोरात : चार महिन्यांत महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ
मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी
बाळासाहेब थोरात : चार महिन्यांत महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात बाजारातील मंदी आणि अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेत महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. मुद्रांक शुल्कात सरसकट ३ टक्के सवलत दिली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के तर राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात थोरात यांनी सांगितले, मुद्रांक शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून, इतर राज्यांनाही या निर्णयाचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्त नोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९ हजार ६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल प्राप्त झाला. डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल ९२ वाढ टक्के तर महसुलात ५९ टक्के वाढ झाली आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत २०१९ साली ८ लाख ४४ हजार ६३६ दस्त नोंदणी होऊन महसूल ९ हजार २५४ कोटी रुपये मिळाला होता. तर २०२० मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत १२ लाख ५६ हजार २२४ दस्त नोंदणी झाली आणि ९ हजार ६२२ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यांत दस्त नोंदणीत ४८ टक्के वाढ तर महसुलात ३.९७ टक्के वाढ झाली.
मुंबई, पुणे या मोठ्या शहरांबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खरेदीच्या किमतीमुळे मुद्रांक शुल्क लाखांत भरावे लागत होते. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला, असे महसूलमंत्री म्हणाले.
................................