बूस्टर डोस उच्च न्यायालयात; जनहित याचिका, केंद्र सरकारला धोरण आखण्याचे निर्देश देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 08:53 AM2022-01-04T08:53:29+5:302022-01-04T08:53:40+5:30
ज्या नागरिकांनी मार्च ते मे २०२१ दरम्यान कोरोनावरील दुसरा डोस घेतला आहे, अशा सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत तज्ज्ञांनी धोरण आखावे,’ अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनावरील बूस्टर डोस देण्यासाठी एकसमान धोरण आखण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती दोन वकिलांनी केली असता न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत १० जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली.
ॲड. धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी न्या. अमजद सय्यद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका सादर केली. मात्र, न्यायालयाने ही याचिका मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सादर करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.
देशात कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरण्याची शक्यता असल्याने नागरिकांना लवकरात लवकर बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे. परंतु, केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेने बूस्टर डोसबाबत अद्याप कोणतेही ठोस धोरण आखलेले नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
‘ज्या नागरिकांनी मार्च ते मे २०२१ दरम्यान कोरोनावरील दुसरा डोस घेतला आहे, अशा सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत तज्ज्ञांनी धोरण आखावे,’ अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
भिवंडीतील चिंबीपाडा आश्रमशाळेत ३० जणांना काेराेना
भिवंडी : भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील २८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. यात २३ मुली, ५ मुले आणि दाेन कर्मचाऱ्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने तालुका आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. बाधित रुग्णांना उपचारांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
चिंबीपाडा आश्रमशाळेत सुमारे ४७० विद्यार्थी आहेत. येथील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची अँटिजन चाचणी केली आहे. काेराेनाची लागण झाल्याचे समजताच पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी सोमवारी आश्रमशाळेत गर्दी केली होती. दरम्यान, अहवाल येणे बाकी असल्याने बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता तालुका वैद्यकीय अधिकारी बी. एस. डावकर यांनी दिली आहे.
राज्यात दिवसभरात
६८ ओमायक्रॉन रुग्ण
nराज्यात सोमवारी ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणाऱ्या रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्णांचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी निदान केले.
nआतापर्यंत राज्यात एकूण ५७८ ओमायक्रॉनबाधित आढळले असून यापैकी २५९ रुग्णांना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
nदिवसभरात नोंद झालेल्या ६८ रुग्णांमध्ये मुंबई-४०, पुणे मनपा-१४, नागपूर-४, पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.
२३७५ नमुने जनुकीय तपासणीसाठी
राज्यात १ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३७५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले. यापैकी १६६ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.