मुंबई मेट्रोला बूस्टर; मेट्रो प्रकल्पांसाठी १०८७ कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 06:36 AM2024-07-24T06:36:21+5:302024-07-24T06:36:34+5:30
मुंबई महानगरात ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) कुलाबा ते सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी १०८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्पांसाठीच्या हिश्श्याच्या स्वरुपात हा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगरात ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) कुलाबा ते सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरू आहे. तर एमएमआरडीएकडून वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४, मंडाळे ते डी.एन. नगर मेट्रो २ बी, ठाणे ते कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर ते कांजूर मार्ग मेट्रो ६, दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९, कल्याण ते तळोजा मेट्रो १२ या मार्गिकांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची गरज असून, कर्जाद्वारे या प्रकल्पांचा मार्ग प्रशस्त करण्यात आला आहे. मात्र, कर्जासोबतच या मेट्रो प्रकल्पांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचाही हिस्सा आहे.
आणखी तरतूद अपेक्षित
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना आधीच विलंब झाला आहे. तसेच त्यांची कामेही संथगतीने सुरू आहेत. त्यात एमएमआरडीएची आर्थिक स्थिती चांगली नाही.
मेट्रो ३ च्या खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. अशा स्थितीत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अधिक तरतूद करणे अपेक्षित आहे.
तरच मुंबईतील मेट्रो प्रकल्प जलदगतीने पूर्ण होऊन वाहतूक सुधारण्यास मदत होईल, असेही ए.व्ही. शेनॉय यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पांसाठी केलेली १,०८७ कोटी रुपयांची तरतूद कोणत्या मेट्रो मार्गासाठी आहे, याबाबत स्पष्टता नाही. मुंबईतील सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी मिळून ही तरतूद असल्यास ती अतिशय तोकडी ठरेल. या तरतुदीमुळे कामे वेगाने होतील, असे वाटत नाही.
- ए.व्ही. शेनॉय, वाहतूक तज्ज्ञ