बोरीवलीतील फुलपाखरू उद्यानाची दुरवस्था
By Admin | Published: May 29, 2017 06:55 AM2017-05-29T06:55:51+5:302017-05-29T06:55:51+5:30
बोरीवली पूर्वेकडील देवीपाडा येथील फुलपाखरू उद्यानाची दुरवस्था झाली आहे. फुलपाखरू उद्यान हे म्हाडांतर्गत आहे. माजी आमदार
सागर नेवरेकर / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली पूर्वेकडील देवीपाडा येथील फुलपाखरू उद्यानाची दुरवस्था झाली आहे. फुलपाखरू उद्यान हे म्हाडांतर्गत आहे. माजी आमदार प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीत फुलपाखरू उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, सद्यस्थितीमध्ये उद्यानाची दुरवस्था झाली आहे.
सद्यस्थितीमध्ये उद्यानाच्या बाहेरील बाजूस फेरीवाले बसतात, तसेच उद्यानाच्या बाहेरील पदपथावर मासळी बाजार भरतो. त्यामुळे येथील परिसर बकाल झाला असून, याचा त्रास येथे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना होत आहे. उद्यानातील मनोरंजनाच्या साहित्याची दुरवस्था झाली आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे फलकदेखील मोडलेल्या स्थितीमध्ये आहेत. उद्यानामध्ये कारंजे असून, त्यात कधी पाणी नसते, तसेच उद्यानाच्या आवारात हॉलदेखील आहे.
त्या हॉलमध्ये लग्न आणि पार्ट्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. उद्यानातील हॉल वापराप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. मात्र, आजही यात बदल झाले नाहीत.
महापालिकेकडे या प्रकरणी पत्रव्यवहार केले आहेत. येथे मुलांना खेळण्यासाठी मैदान बांधले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मैदानाऐवजी उद्यान बांधण्यात आले. सोमवारी या प्रकरणी महापालिकेसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.
- गीता सिंघण,
स्थानिक नगरसेविका,
प्रभाग क्रमांक १२