बोरीवली, कांदिवली, दहिसर पुन्हा झाले ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:59 AM2020-09-27T00:59:46+5:302020-09-27T01:00:15+5:30
अंधेरी पूर्व भागात सर्वाधिक मृत्यू । प्रशासन म्हणते, चाचणी वाढविल्याने वाढले रुग्ण
मुंबई : चाचणीचे प्रमाण वाढविल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र गेल्या महिन्याभरात बोरीवली, कांदिवली, दहिसर, मलबार हिल आणि मुलुंड अशा विभागांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. अंधेरी पूर्व विभागात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली असून, वांद्रे प. विभागात सर्वांत कमी म्हणजे ४५ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत आहेत.
मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्या वेळेस वरळी, दादर, धारावी, वडाळा, भायखळा हे विभाग हॉटस्पॉट ठरले होते. येथील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसून येत होती. मात्र ‘चेस द व्हायरस’ व अन्य उपाययोजनांमुळे जूनपर्यंत या सर्व हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. परंतु आता पश्चिम उपनगरातील इमारतींमध्ये कोरोनारुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या मुंबईत असलेल्या सक्रिय रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, दहिसर, मलबार हिल, मुलुंड या विभागातील आहेत. यापैकी अंधेरी पश्चिम - विलेपार्ले पश्चिम, जोगेश्वरी - अंधेरी पूर्व, मालाड - मालवणी आणि बोरीवली या ठिकाणी ११ हजार सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत सुमारे १० लाख ५० हजार चाचण्या झाल्या आहेत. तसेच बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील ३० लाख लोकांचा शोध घेण्यात आला आहे.
सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ (टक्के)
विभाग रुग्णवाढ
एच पश्चिम.... वांद्रे पश्चिम १.५७
आर मध्य.... बोरीवली १.५२
के पश्चिम.... अंधेरी पश्चिम १.३८
आर उत्तर.... दहिसर १.२५
आर दक्षिण.... कांदिवली १.२३
पी दक्षिण.... गोरेगाव १.१९
डी.... मलबार हिल १.१६
टी... मुलुंड १.११
आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडलेले विभाग
विभाग एकूण रुग्ण सक्रिय मृत्यू
आर मध्य..... बोरीवली १२३४१ २२३३ १५१
के पश्चिम.... अंधेरी प. ११७८६ १९६१ ३७०
पी उत्तर.... मालाड ११४९८ १४२२ ४१८
के पूर्व... जोगेश्वरी, अंधेरी पूर्व ११४०५ १५१२ ५८५
मुंबईत ६५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. तर रुग्णवाढीचा दर १.०७ टक्के आहे.
च् मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत.
या कारणांमुळे वाढतोय प्रसार
कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. मात्र त्यांना प्रवासासाठी मर्यादित साधने उपलब्ध असल्याने बेस्टमध्ये गर्दी वाढत आहे.
गणेशोस्तव रुग्णसंख्या वाढली. पुढच्या महिन्यात नवरात्रौत्सव असल्याने सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
मास्कचा वापर अत्यावश्यक आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी आता नागरिक तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येते