मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील स्कायवॉक हा जाहिरातींचा फलक होऊ लागला आहे. कारण स्कायवॉकवर १० जाहिरात फलक व ११ विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर बसविण्यात आले आहे. तसेच बेघरांचा अड्डा, फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे प्रवाशांना स्कायवॉकवरून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे.
बोरीवली रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ ते ३ पर्यंतचा भाग या स्कायवॉकने जोडला गेला आहे. स्कायवॉकवर महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रेमी युगुलांचीही गर्दी असते. याशिवाय स्कायवॉकला भेगा पडल्या असून लाद्याही निघाल्या आहेत. तसेच स्कायवॉकला केबल वायरचा विळखा बसला आहे. दहा मोठमोठे जाहिरातींचे फलक स्कायवॉकवर लावण्यात आले आहेत. विविध मोबाइल कंपन्यांचे ११ टॉवर उभारले आहेत. त्याच्यासाठी लागणारा वीजपुरवठा हा येथील हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मरमधून केला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फुलांचा हार, गजरा विक्रेते हे स्कायवॉकवर बसून काम करतात. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पुरेसी जागा नसते. महापालिकेच्या अखत्यारीतील या स्कायवॉकवर महापालिका अधिकारी या सर्व समस्यांकडे डोळेझाक करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
स्कायवॉकवर अस्वच्छता!पान-सुपारी, गुटखा, तंबाखू खाऊन दुतर्फा थुंकल्याने अस्वच्छता पसरली आहे. स्कायवॉकवर बेघरांनी आश्रय घेऊन संसार थाटला आहे. बोरीवली जेल, म्युनिसिपल मार्केट, चंदावरकर रोड, डॉन बास्को स्कूल या ठिकाणी जाण्यासाठी या स्कायवॉकचा वापर केला होतो. पण या स्कायवॉकवर सुरू असलेल्या अवैध व्यवसायांमुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे , अशी प्रतिक्रिया प्रवासी प्रमोद जाधव यांनी दिली.