लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर राहणाऱ्यांना बोरिवली ते उमरगाव दरम्यानच्या एसटी सेवा अतिशय कमी प्रमाणात असल्याने त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे बोरिवली ते उमरगावदरम्यान चालणाऱ्या खाजगी बस अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करून प्रवाशांची पिळवणूक करत आहेत. फाइट फॉर राइट फाउंडेशनचे उमरगाव सचिव प्रतीक शिर्वटकर यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्राचे परिवहनमंत्री यांना याबाबत लेखी निवेदन दिले. शिवाय, बोरिवली ते उमरगावदरम्यान जादा एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत विभाग नियंत्रक राज्य परिवहन पालघर विभाग यांनी डहाणू आगाराचे आगार व्यवस्थापक यांना सदर बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती फाइट फॉर राइट फाउंडेशनचे विनोद घोलप यांनी दिली.