बोरिवली- वेंगुर्ले दरडोई ३ हजार ३०० एसटी भाडे प्रासंगिक करारावर एसटी आरक्षित; दर जास्त असल्याने प्रवाशांचा संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 08:38 PM2020-06-28T20:38:41+5:302020-06-28T20:40:29+5:30

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस चालविण्यात येत आहेत.

Borivali-Vengurle 3 thousand 300 ST per capita ST reserved on relevant agreement; Passengers angry over high rates | बोरिवली- वेंगुर्ले दरडोई ३ हजार ३०० एसटी भाडे प्रासंगिक करारावर एसटी आरक्षित; दर जास्त असल्याने प्रवाशांचा संताप 

बोरिवली- वेंगुर्ले दरडोई ३ हजार ३०० एसटी भाडे प्रासंगिक करारावर एसटी आरक्षित; दर जास्त असल्याने प्रवाशांचा संताप 

Next

- कुलदीप घायवट  

मुंबई : लॉकडाऊन काळात नॉन रेड झोनमध्ये एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु आहे. राज्यांतर्गत एसटीचा प्रवास प्रासंगिक करारानुसार केला जात आहे. मात्र यासाठी घेतले जाणारे भाडे हे  चौपट असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वेंगुर्ले ते बोरिवली ते वेंगुर्ले प्रवासासाठी साधारण ७०० ते ८०० रुपयांत प्रवास होत होता. मात्र आता दरडोई ३ हजार ३०० रुपये भाडे आकारला जातोय. त्यामुळे सामान्य प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळला जाईल, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली.  

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस चालविण्यात येत आहेत. नागरिकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन एसटी बस आरक्षित केल्या जातात. प्रासंगिक करारामध्ये २२ प्रवाशांच्या ग्रुप लीडरच्या नावाने एसटी बसचे आरक्षण केले जाते. बसमधील २२ आसनाचा ग्रुप पुर्ण झाल्यानंतरच बस सुटण्याचे नियोजन केले आहे.  राज्यांतर्गत एसटी महामंडळाची प्रासंगिक करारावर सेवा सुरु आहे. यामधून परतीच्या प्रवासाचे भाडे आकारले जाते. एका किमी मागे ५६ रुपये एसटी महामंडळ आकारत आहेत. 

वेंगुर्ले ते बोरिवली ५४० किमीच्या प्रवासासाठी ३० हजार २४० रुपये एका फेरीचे भाडे होते. मात्र प्रासंगिक करारानुसार परतीच्या प्रवासाचे भाडे प्रवाशांकडून द्यावे लागते. त्यामुळे एकूण बस भाडे ६० हजार ४८० रुपये होते. यावर १८ टक्के वस्तू आणि सेवा करामुळे एकूण भाडे ७१ हजार ६८६ रुपये  प्रवाशांना भरावे लागत आहे. एसटीच्या नियमानुसार एका बसमधून प्रत्येकी २२ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे दरडोई ३ हजार ३०० रुपयांचा भार सोसावा लागत आहे. 

वेंगुर्ले ते बोरिवली आणि बोरिवली ते वेंगुर्ले असा प्रवास करण्यासाठी विठाई एक्सप्रेस आणि साई मानसीश्वर या दोन लालपरी वेंगुर्ले-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या बस शिरोडा, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली, राजापुर, लांजा, हातखंब, संगमेश्वर, चिपळूण, महाड, माणगाव, पेण, पनवेल, खारघर, तुर्भेनाका, कालवा, ठाणे, मुलुंड, भांडुप, चेंबूर, सायन, दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली असा बसचा प्रवास असणार आहे.

लॉकडाऊनपूर्वी वेंगुर्ले ते बोरिवली ते वेंगुर्ले प्रवासासाठी साधारण ७०० ते ८०० रुपयांत प्रवास होत होता. आता २२ प्रवासी घेऊन एसटी धावणार आहे. मात्र या प्रवासाचे परतीचे भाडे आकारले तरी, १ हजार ६०० होतात. त्यामुळे एसटीने चौपट भाडे आकारले जाऊ नये. यामुळे एसटीचे प्रवासी खासगी बसची वाट धरतील. गणेशोत्सव  काही दिवसात येत असल्याने प्रवाशांसाठी कमी दराच्या आणि मुबलक एसटी बस एसटी महामंडळाने पुरविल्या पाहिजेत, अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली.

राज्य सरकारच्या नियमानुसार बसमधील प्रवासी संख्या २२ असणार आहे. प्रवासात आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. तिकिट दर वेंगुर्ल ते बोरीवली ३ हजार ३०० रुपये असे आहे, अशी माहिती वेंगुर्लेचे आगार प्रमुख एन. डी. वारंग यांनी दिली. 

Web Title: Borivali-Vengurle 3 thousand 300 ST per capita ST reserved on relevant agreement; Passengers angry over high rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.