गोराईत तीव्र पाणी टंचाई! पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव; पालिका प्रशासनाने केला इन्कार
By मनोहर कुंभेजकर | Published: April 7, 2023 05:21 PM2023-04-07T17:21:48+5:302023-04-07T17:22:18+5:30
बोरिवली पश्चिम गोराई म्हाडा वसाहत आणि गोराई खाडी पलीकडील गोराई गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
मुंबई : पालिकेने मुंबईत १५ टक्के पाणी कपात जारी केली खरी,मात्र बोरिवली पश्चिम गोराई म्हाडा वसाहत आणि गोराई खाडी पलीकडील गोराई गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. गेले काही दिवस संपूर्ण गोराईमधून पाण्याच्या तक्रारी येत आहेत.फक्त ५ ते १० मिनीटे पाणी येत असल्याने येथील राहणाऱ्या संतप्त रहिवाश्यांसह माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी काल दुपारी बोरिवली पश्चिम येथील महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात जाऊन पालिका अधिकाऱ्यांना घेराव घातला.यावेळी आर मध्य वॉर्ड च्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, पालिकेचे एक्सिक्युटीव्ह इंजिनियर सोंडे, सब इंजिनियर डागले व अवधूत पवार यांना पाणी टंचाई प्रकरणी त्यांना जाब विचारल्याची माहिती त्यांनी दिली.
तर आपण तेथील नागरिकांना वेळ दिला होता.त्यांनी घेराव
काही घेराव घातला नाही. उलट त्यांची पाणी समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू असून येत्या दोन तीन दिवसात त्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी माहिती सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी लोकमतला दिली.
याबाबत शिवानंद शेट्टी यांनी लोकमतला सांगितले की,म्हाडा गोराई वसाहतीला मार्वे येथून तर बोरिवली पलीकडील गोराई गावाला मालाड वरून पाणी येते.पालिकेने १५ टक्के पाणी कपात केली,मात्र दोन्ही भाग डेडएन्ड असल्याने येथे ८५ टक्के पाणी कमी येते.पूर्वी दुपारी १२ ते २-२.३० पर्यंत नसगरिकांना पाणी मिळत होते.आता फक्त ५ ते १० मिनीटे पाणी येते.त्यामुळे नागरिक विशेष करून येथील महिला वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे.लवकरात-लवकर यावर तोडगा काढण्यास सांगितले.अन्यथा सदर जन-आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा आपण पालिका प्रशासनाला दिल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
गोराई येथील आर एस सी ३५/३२ प्लॉट १४४,१४५, प्लॉट आर एस सी : २२ प्लॉट ११, १२,१३, २८, आर एस सी ४४/३९ येथील प्लॉट २४४,२४५,२५४,२५६ आर एस सी ५० येथील प्लॉट १७९, १९३ आर एस सी ३१ प्लॉट १९९, आर एस सी १७/२७ प्लॉट १२२,८,१२५, आर एस सी ३३ प्लॉट २०६ व गोराई १ येथील प्लॉट क्र २९, ७७, १०७, संपूर्ण आर एस सी २० व ११३ व त्याचबरोबर, वजीरा शारदा इस्टेट आणि कासा बेलिसिमो बिल्डिंग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली.