बोरिवलीकरांना मिळणार अद्ययावत नैसर्गिक वायूवर चालणारी स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:24+5:302021-06-01T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरिवली पश्चिम येथे महापालिकेची बाभई स्मशानभूमी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. वाढते प्रदूषण आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरिवली पश्चिम येथे महापालिकेची बाभई स्मशानभूमी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. वाढते प्रदूषण आणि लाकडांची अडचण, त्यासाठी होणारी ज़ंगलतोड आणि बऱ्याचवेळा अपुऱ्या सरण व्यवस्थेमुळे मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे लागत आहे. या स्मशानालगतच्या भूखंडावरच अद्ययावत नैसर्गिक वायूवर चालणारी स्मशानभूमी व्हावी, यासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी हे २०१९पासून प्रयत्नशील होते. यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ही स्मशानभूमी आता पूर्णत्वाकडे जात आहे.
तांत्रिक अडचणी दूर करून दाहिनी लवकरच सुरू व्हावी, याकरिता पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार व आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डाॅ. भाग्यश्री कापसे यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमवेत भेट देऊन सदर वायू दाहिनी दहनासाठी १ महिन्यातच सुरू करण्याचे आश्वासन दिले. सदर स्मशानभूमी ही लवकरच अंत्यविधीसाठी उपलब्ध करावी, यासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिका अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. वनराईने नटलेली ही जागा स्मशानभूमी न वाटता एका छोट्या अरण्यात आल्यासारखे वाटते, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केले.
यावेळी स्थानिक आमदार सुनील राणे, भाजप मुंबई सचिव विनोद शेलार, नगरसेवक प्रवीण शाह, नगरसेविका अंजली खेडकर, नगरसेवक जगदीश पटेल, उत्तर मुंबई भाजपचे सरचिटणीस दिलीप पंडित, महेश राऊत, राजेश भट्ट, अमित व्यास व मायाशंकर चौबे, प्रतीक साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------