स्नेहा मोरे, मुंबईजुन्या सायकली, लोखंडी रॉड्स, बंद पडलेल्या स्कूटर्स यापासून तयार केलेली मधमाशी पाहिलीय? किंवा मग शहामृग? नाही ना? पण जे.जे़ स्कूल आॅफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलेय. भंगार आणि टाकाऊ वस्तूंपासून समाजाला नवनिर्मितीचा संदेश देण्यासाठी जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे आजी-माजी विद्यार्थी एकवटले आहेत.जे.जे.स्कूल आॅफ आर्टने हिंदुस्थान पेट्रोलिअमच्या साहाय्याने ‘पब्लिक आर्ट प्रोजेक्ट’ नावाचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत लँडस्केप पेंटिंग्ज, वॉल पेंटिंग, ग्राफिटी आर्ट्स, शिल्पकला, वारली चित्रकला आणि भंगारातून आर्ट इन्स्टॉलेशन असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यात चेंबूर परिसरातील रहदारीच्या काही भिंतीची निवड करून त्यावर विविध राज्यांतील संस्कृती आणि प्रेक्षणीय स्थळे रेखाटण्यात आली आहेत. तसेच भिंतीवर काही वेगळ््या प्रकारची शिल्पेही साकारण्यात आली आहेत.‘पब्लिक आर्ट प्रोजेक्ट’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलिअमच्या भंगारातील वस्तूंपासून मोठमोठे आर्ट इन्स्टॉलेशन्स तयार करण्यात आले आहेत. वाशी येथील हिंदुस्थान पेट्रोलिअमच्या वसाहतीत तयार करण्यात आलेल्या आर्ट इन्स्टॉलेशन्स फिनिशिंगच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. या आर्ट इन्स्टॉलेशन्साठी प्राणी-पक्ष्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात मग मेंढी, घार, मधमाशी आणि शहामृग असे १०-१२ फुटांचे इन्स्टॉलेशन्स तयार केले आहेत. यात जे.जे़ स्कूल आॅफ आर्ट्सच्या विविध कला शाखांतील ३४ विद्यार्थ्यांचा आणि जे.जे़तून शिक्षण घेतलेल्या कलाकारांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रोजेक्टला जे.जे़ कला महाविद्यालयातील प्राध्यापक शशांक म्हशीलकर आणि यशवंत भावसार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
भंगारातून होतोय कलेचा जन्म !
By admin | Published: June 10, 2015 3:50 AM