बोटावाला चाळ @ १०३

By Admin | Published: January 8, 2016 02:23 AM2016-01-08T02:23:38+5:302016-01-08T02:23:38+5:30

प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडी येथील बोटावाला चाळीने नुकतीच शंभरी साजरी केली. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम करत चाळीच्या चौथ्या पिढीने हा हीरक महोत्सव रंगतदार केला.

Botawala Chal @ 103 | बोटावाला चाळ @ १०३

बोटावाला चाळ @ १०३

googlenewsNext

प्रवीण दाभोळकर,  मुंबई
प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडी येथील बोटावाला चाळीने नुकतीच शंभरी साजरी केली. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम करत चाळीच्या चौथ्या पिढीने हा हीरक महोत्सव रंगतदार केला. खरं म्हणजे २०१२ मध्येच या चाळीला शंभर वर्षे पूर्ण झाली. तथापि, काही व्यत्यय आल्याने अखेर सेलीब्रेशनसाठी २०१६ चा मुहूर्त मिळाला. स्वच्छतेला या चाळीत सर्वोच्च महत्त्व दिले जात असल्याचे येथील रहिवासी अभिमानाने सांगतात.
गोष्ट आहे प्रभादेवीतल्या बोटावाला चाळीची... संपूर्ण प्रभादेवी परिसरात तशा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच चाळी शिल्लक आहेत. शंभरी पार केल्याने या बोटावाला चाळीला विशेष महत्त्व आहे. ही चाळ जुनी म्हणजे अगदी स्वातंत्र्यापूर्वीची आहे. मोक्याचे ठिकाण आणि सागाच्या लाकडाचे मजबूत बांधकाम ही या चाळीची ओळख. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्याही खूप आधी माझ्या आजोबांनी ५० पैसे दराने या चाळीत खोली घेतली. तेव्हापासून माझे वडील, मी आणि माझी मुले अशी चौथी पिढी या चाळीत राहतेय, गणेश राहटे हे चाळीबद्दल आपुलकीने सांगत होते.
दोन माळ्यांची साधारण चौऱ्यांशी खोल्या असलेली ही चाळ. पण गेली कित्येक वर्षे इथली माणसं एकोप्याने येथे नांदत आहेत. आज ना उद्या आपणही इमारतींमध्ये जाऊ, तेव्हा एकमेकांसोबत बालपण घालवलेले मित्र भेटतील का? आपुलकी, जिव्हाळा कायम राहील का? असे अनेक विचार चाळकऱ्यांच्या मनात सतत घोळत असतात. इथे मात्र असले प्रश्न निर्माण होत नाहीत. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली एकमेकांविषयीची प्रेमभावना, चाळीबद्दलचा जिव्हाळा आजही कायम आहे. भविष्यातदेखील ही आपुलकी जपली जाईल, अशी खात्री इथल्या रहिवाशांना आहे. विभागातील जवळपास सर्वच चाळी तुटल्या. त्यामुळे सर्वांत जुन्या आणि शंभर वर्षे पूर्ण केलेल्या या चाळीचा जबरदस्त अभिमान येथील सर्व रहिवाशांना आहे.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी इथल्या नागरिकांना तुमची चाळ नेमकी किती वर्षे जुनी, या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. पण साधारण १५-२० वर्षांपूर्वी चाळीतील एका खोलीच्या रिपेअरिंगचे काम सुरू असताना घराच्या भिंतीमध्ये एक बिल्ला घरमालकाला सापडला. त्यावर १९१२ सालची नोंद होती. मग तेव्हापासून आपली चाळ १९१२ साली स्थापन झाली, असा तर्क लावण्यात आला. त्यानुसार २०१२ साली चाळीचे शतक महोत्सव साजरे होणार होते. तथापि, काही प्रसंग चाळीवर ओढवले आणि हा सोहळा पुढेपुढे ढकलला गेला. अखेर २०१६ या नववर्षाच्या सुरुवातीलाच चाळीला शंभरी पूर्ण झाल्याच्या आनंदाचे सेलीब्रेशन करायचे ठरले.
चाळीचा इतिहास...
दहा दशके जुना वारसा सांगणारी ही चाळ आजही दिमाखात उभी आहे... बोटावाला परिवाराने मुंबईत बऱ्याच ठिकाणी जागा घेतल्या होत्या. त्यातलीच ही प्रभादेवीची चाळ. चाळीत १९१२ च्या दरम्यान जेव्हा राहायला मंडळी आली तेव्हा ३ ते ५ रुपये भाड्याने इथे खोल्या मिळत.
तेव्हाच्या कमाईनुसार ते भाडेही परवडणारे नव्हते. त्यानंतर लोक पागडी पद्धतीने इथे राहू लागले. वर्षभरातच भाडे थकल्यावर घरमालक गुमान घर सोडायचा आणि मुंबईत दुसरीकडे जागा शोधायचा. त्या काळी राहण्यासाठी मुंबईत ऐसपैस जागा होती, लोकसंख्याही कमीच होती.
कालांतराने गिरण्या आल्यानंतर लोकांना रोजगार मिळू लागला. कोकणी माणूस मोठ्या संख्येने मुंबईची वाट धरू लागला. तेव्हा गिरणीत काम करत खोली घेऊन राहणारी कोकणवासीय मंडळी इथे पिढ्यान्पिढ्या राहत आहेत.
रहिवासी आणि चाळ कमिटीच्या धोरणांमुळे स्वच्छता, डागडुजी याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. चाळीच्या पहिल्या मजल्यावरच्या अर्ध्या जागेत पालिकेची शाळा चालते. त्यामुळे ही जागादेखील नेहमीच स्वच्छ पाहायला मिळते. पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत शिक लेल्या चाळीतल्या रहिवाशांना शाळेबद्दलही तेवढीच आपुलकी आहे.
सफाई कामगाराची तिसरी पिढी
बोटावाला चाळीत रहिवासी जसे पिढ्यान्पिढ्या राहत आहेत, त्याप्रमाणे सफाई कामगारांच्या तिसऱ्या पिढीने चाळीच्या स्वच्छतेचा विडा उचलला आहे. दिनेश रामजी राठोड हे अनेक वर्षांपासून चाळीच्या स्वच्छतेचे काम चोखपणे पाहतात. चाळीकडून त्यांना राहण्यासाठी नळाची जागा देण्यात आली आहे. हे राठोड कुटुंब चाळीच्या स्वच्छतेकडे लक्ष देतात. रहिवासीदेखील स्वच्छतेसाठी कमालीचे आग्रही असतात.
१०३ वर्षे होऊनही या चाळीचे बांधकाम चांगलेच तग धरून आहे. रहिवाशांनी चाळीची अशीच काळजी घेतली तर अजून १० ते १५ वर्षे या चाळीत व्यवस्थितपणे राहू शकतो, असे चाळ कमिटीचे प्रमुख कार्यवाह रवींद्र तळेकर सांगतात. रामनवमी आणि साईबाबा उत्सव येथे थाटामाटात साजरा केला जातो. त्या वेळी चाळकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवाची तयारी करत असल्याचेही ते सांगतात.
जेथे चाळ तेथे डेव्हलपमेंट असे काहीसे समीकरण गेल्या काही वर्षांत बनले आहे. त्याला बोटावाला चाळ तरी कशी अपवाद ठरू शकेल. चाळ कमिटीचे उपाध्यक्ष रणजित भाटकर सांगतात, एका खासगी बिल्डरने बोटावाला चाळ विकत घेतली. चाळ नंबर २ चे रहिवासी इमारतीत राहायला गेले, पण आम्ही अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहोत. इमारतीत खूप जागा मिळावी, अशी आमची अपेक्षा मुळीच नाही. कारण मध्यमवर्गीय रहिवाशांना भविष्यात त्याची डागडुजी परवडणारी हवी. आतापर्यंत जसे एकत्र राहत आलो तसे पुढची अनेक वर्षे एकत्र कसे राहता येईल, याची जाणीव ठेवून कोणताही निर्णय चाळ कमिटी आणि रहिवाशांच्या संगनमतानेच घेतला जातो.

Web Title: Botawala Chal @ 103

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.