Join us

अजित पवारांची दोन्ही मुले सक्रिय; पार्थ होता भाजप नेत्यांच्या संपर्कात, नेत्यांच्या घेतल्या भेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 10:32 AM

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर पार्थ राजकारणात सक्रिय नव्हता.

- दीपक भातुसे

मुंबई : मावळ लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर राजकीय अज्ञातवासात असलेला अजित पवारांचा मुलगा पार्थ तसेच सक्रिय राजकारणात नसलेला दुसरा मुलगा जय हे दोघेही आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर या दोघांचे राजकारणात सक्रिय होणे, त्यामुळेच चर्चेचा विषय ठरले आहे. पार्थ पवारने तर या बंडात पडद्यामागून सूत्रे हलवल्याची माहिती आहे. बंडाच्या जुळणीसाठी पार्थने भाजपच्या आणि संघांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. 

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर पार्थ राजकारणात सक्रिय नव्हता. मावळमधील उमेदवारीवरून पवार कुटुंबीयांमध्ये त्यावेळी वाद उफाळला होता. पार्थने लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी शरद पवार यांची भूमिका होती. शरद पवार माढामधून तसेच सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार, हे निश्चित होतेच. पार्थही रिंगणात उतरल्यास एकाच घरातील तीन उमेदवार झाले असते म्हणून पवारांनी पार्थच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र पार्थ उमेदवारीवर अडून बसल्याने शरद पवारांनी माढातून आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यातच पराभव झाल्याने पुन्हा राजकारणात कसे सक्रिय व्हायचे, हा प्रश्न पार्थसमोर होता. दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीनंतर रोहित पवार हा शरद पवारांबरोबर सावलीसारखा फिरत होता. आपल्याला डावलले जात असल्याने पार्थ तेव्हा नाराज होता अशी चर्चा होती. मात्र अजित पवार यांच्या बंडाने हा प्रश्न सोडवला आहे.

स्टेजवर दोन्ही मुलेअजित पवारांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या बोलावलेल्या बैठकीत अजित पवार यांच्या भाषणावेळी जय स्टेजवर अजित पवारांच्या पाठी उभा होता. तर यावेळी पार्थ समोरील सोफ्यावर बसला होता.

टॅग्स :अजित पवारपार्थ पवारराष्ट्रवादी काँग्रेस