मुंबई : फोनकॉलवर रुग्णालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघांना दोन दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी मानखुर्द येथून अटक केली आहे. वाहीद खान आणि शाहीद शेख अशी या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.गुजरातमधील अवकार या नामांकित रुग्णालयात कॉल करून हे रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी २ मार्चला एका अज्ञात इसमाने दिली होती. याबाबत गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल करत या फोनचा तपास सुरू केला. दरम्यान, मानखुर्द परिसरात राहणाऱ्या शाहीद शेख या इसमाच्या नावावर हे सीमकार्ड निघाले. गुजरात पोलिसांनी शिवाजी नगर पोलिसांच्या मदतीने या आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आपल्याकडे असा नंबरच नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून याच परिसरातील वाहीद खान या सीमकार्ड विक्रेत्यालादेखील ताब्यात घेतले. वाहीदने बनावट कागदपत्रांच्या आधारे हे सीमकार्ड अन्य एका इसमाला विकले. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीचादेखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानुसार गुजरात पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी गुजरातमधील साबरमती येथे नेल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
मानखुर्दमधील दोघांना अटक
By admin | Published: March 17, 2017 4:57 AM