Join us

मुंबईत ३१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:06 AM

मुंबईत ३१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस७३ टक्के ज्येष्ठांना फक्त एक डोसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

मुंबईत ३१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

७३ टक्के ज्येष्ठांना फक्त एक डोस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत अजूनही लसीकरण प्रक्रियेने वेग घेतलेला नाही, १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ३० लाख नागरिकांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. त्यात केवळ ३१ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, म्हणजेच या नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ७३ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

लसीकरण प्रक्रियेत ४५ ते ५९ वयोगटातील ८ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ४५ टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. पालिका प्रशासनाकडून आता लवकरच लसीकरण प्रक्रियेचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात येणार असून यात लसीकरणानंतर मृत्यू व रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे, याविषयी संशोधनात्मक अभ्यास करण्यात येईल.

मुंबईत ६० हून अधिक वय असणारे ११.१ लाख नागरिक आहेत. त्यातील ८.१ लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून ३.३ लाख नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण प्रक्रियेला सुरुवातीपासून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सुरुवातीच्या तीन दिवसांतच या गटातील लाभार्थ्यांनी १० हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र दुसरीकडे अजूनही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. ९१ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तर ६२ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच, २.३ लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ५५ टक्क्यांहून कमी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

* संशोधनांती निष्कर्ष

राज्यासह मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूंचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. मात्र याविषयी, शास्त्रीय संशोधन व अभ्यासानंतर निष्कर्षापर्यंत यावे लागेल.

- डॉ. प्रदीप आवटे, साथ सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग

* एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - ३२७३९७

फ्रंटलाइन वर्कर्स – ३८९५२८

१८ ते ४४ वय – ८२७६३

४५ हून अधिक वय - २२०२१८७

एकूण - ३००१८७५

........................................