मेट्रो-४ आणि मेट्रो-५ या दोन्ही मार्गिका ठाण्यामध्ये जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:55 AM2019-06-19T01:55:16+5:302019-06-19T01:55:27+5:30
ठाणे येथे दोन्ही मार्गिकांचे संयुक्त मेट्रो स्थानकही बनवण्यात येणार
मुंबई : वडाळा-घाटकोपर-ठाणे- मुलूंड- कासारवडावली ही मेट्रो- ४ आणि ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो-५ या दोन्ही मार्गिका ठाणे येथे जोडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बनवली आहे. ठाणे येथे दोन्ही मार्गिकांचे संयुक्त मेट्रो स्थानकही बनवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडाही बनवण्यात आला आहे.
कासारवडवली हे या स्थानकापासून पाचशे मीटरवर असल्याने संयुक्त स्थानक झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि श्रमही वाचणार आहे आणि एमएमआरडीएचा २० कोटी रूपयांचा खर्चही वाचणार आहे. मेट्रो-५ मार्गिकेच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. एफकॉन्स, लार्सन अॅन्ड टूब्रो आणि एनसीसी या कंपन्यांकडून निविदा आल्या आहेत. पुढील दोन महिन्यात त्या उघडल्या जाणार आहेत. २४ किलोमीटरच्या मेट्रो-५ मार्गावर १७ स्थानके प्रस्तावित आहेत. २०२१ पर्यंत या मार्गावर २ लाख ३० हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. मेट्रो-४ आणि मेट्रो-५ हे दोन्ही प्रकल्प २०२१ पर्यंत कार्यरत होणार आहेत.