Join us

मोटारसायकल जाळणा-या दोघांना अटक

By admin | Published: January 14, 2015 2:53 AM

कांदिवलीच्या समतानगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन गाड्या जळाल्या होत्या. पोलिसांनी तपासाअंती दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबई : कांदिवलीच्या समतानगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन गाड्या जळाल्या होत्या. पोलिसांनी तपासाअंती दोन आरोपींना अटक केली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून पूर्ववैमनस्यातून मोटारसायकल जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंग इस्टेट रोड क्र मांक १ येथे तीन गाड्या जळाल्याचा कॉल पहाटे उत्तर प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षास आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे गेले. पोलिसांनी तपास केला असता महत्त्वाची माहिती मिळवली. फिर्यादी गिरीश झाला यांची मोटारसायकल त्यांचा भाचा भूपेंद्र हा चालवत असे. याच परिसरात राहणारा आरोपी वर्धन साळुंखे याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग वर्धनच्या डोक्यात होता. रविवारी रात्री वर्धन हा एका मित्राच्या वाढदिवसानंतर घरी परतत होता. समतानगर येथील नाल्याजवळ वर्धन आणि एक अल्पवयीन आरोपी दारू प्यायले. दारूच्या नशेत वर्धन आणि आरोपीने गिरीशची पल्सर मोटारसायकल विनाचावी सुरू केली. काही अंतर नेल्यावर ती मोटारसायकल बंद पडली. रस्त्यालगत असलेल्या सँट्रो कारजवळ ती मोटारसायकल उभी केली. दोन्ही आरोपींनी पुन्हा एक मोटारसायकल विनाचावीने सुरू केली. ते बोरीवली परिसरात फिरून आले. दारूच्या नशेत दोन्ही आरोपींनी पल्सर मोटारसायकलवर पेट्रोल टाकून ती जाळली. आग भडकल्याने तीन गाड्यांचे नुकसान झाले. आग लागताच दोन्ही आरोपी तेथून पळून गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले. समतानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)