Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : दोन्ही शिवसेना मुंबईच्या बॉस; वायकरांनी निवडणूक तर कीर्तिकरांनी मनं जिंकली 

By अतुल कुलकर्णी | Published: June 5, 2024 10:57 AM2024-06-05T10:57:20+5:302024-06-05T10:57:54+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत भाजपचे नुकसान झाले. २०१४ मध्ये भाजपला तीन जागी यश मिळाले होते यावेळी फक्त केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या रूपाने एकाच जागेवर समाधान मानावे लागले. एकेकाळी सहापैकी पाच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला, मुंबईत मध्यंतरी प्रचंड नुकसान झाले.

Both Shiv Sena Mumbai bosses; Waikars won the elections and Kirtikars won the hearts  | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : दोन्ही शिवसेना मुंबईच्या बॉस; वायकरांनी निवडणूक तर कीर्तिकरांनी मनं जिंकली 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : दोन्ही शिवसेना मुंबईच्या बॉस; वायकरांनी निवडणूक तर कीर्तिकरांनी मनं जिंकली 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मुंबई : मुंबई कोकणातील १२ लोकसभा मतदारसंघांपैकी ३ जागी उद्धव सेनेने दणदणीत यश मिळवत ‘मुंबई कोकणचे आम्हीच बॉस आहोत’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपला मात्र मुंबईत दोन जागांवर पाणी सोडावे लागले. जिथे अजित पवारांना बारामती राखता आली नाही, तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची सुभेदारी आपलीच हे दाखवून दिले. 

मुंबईत भाजपचे नुकसान झाले. २०१४ मध्ये भाजपला तीन जागी यश मिळाले होते यावेळी फक्त केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या रूपाने एकाच जागेवर समाधान मानावे लागले. एकेकाळी सहापैकी पाच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला, मुंबईत मध्यंतरी प्रचंड नुकसान झाले. एकही उमेदवार निवडून आला नाही. यावेळी ती कसर वर्षा गायकवाड यांनी निसटत्या मतांनी का होईना, भरून काढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत शिवसेनेवर हक्क सांगितला, त्यावेळी ठाणे जिल्हा राखण्याचे त्यांच्या पुढे मोठे आव्हान होते. ठाण्याची जागा भाजपला हवी होती.

मात्र, शिंदे यांनी स्वतःचे राजकीय कौशल्य वापरून ती स्वतःकडे घेतली आणि मोठ्या मताच्या फरकाने विजयी देखील केली. मतमोजणीच्या आक्षेपानंतर अवघ्या ४८ मतांनी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना पराभव पत्करावा लागला आणि शिंदे सेनेला मुंबईत एक जागा जिंकली. मात्र या एका विजयाचा त्यांना विधानसभेत किती फायदा होईल हे सांगणे कठीण आहे. पण मुंबई - कोकणात शिंदे गटाने ५ जागी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ३ जागा त्यांना जिंकता आल्या. हा स्ट्राईक रेट शिंदे गटासाठी निश्चित सुखावणारा आहे.

उद्धव ठाकरे गटाने मुंबई, कोकणात ९ जागी उमेदवार उभे केले होते. मात्र ३ जागी त्यांना यश मिळाले. अमोल कीर्तीकर निवडून आले असते तर, ठाकरे गटाला ४ जागा मुंबईत जिंकल्याचे समाधान मिळाले असते. भाजपने ५ जागी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ३ उमेदवार विजयी झाले. कोकणात दोन्हीं शिवसेनेचा बोलबाला कायम आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने रायगड आणि भिवंडीत एक - एक जागा जिंकून मुंबई, कोकणातला प्रवेश पक्का केला.

शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना खासदारकी देत त्यांच्या पक्षात घेतले मात्र मुंबईत त्याचा त्यांना फायदा झाला नाही. संजय निरुपम यांना घेतल्याचाही म्हणावा तसा फायदा झाला नाही. पियुष गोयल यांचा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता त्यामुळे ते निवडून आले. पण मुंबईत उत्तर भारतीयांची मते एकत्रित करू शकेल असा एकही चेहरा भाजपला स्वतः सोबत जोडता आला नाही. त्याचाही फटका त्यांना या निवडणुकीत बसला. 

वायकरांनी निवडणूक तर कीर्तिकरांनी मनं जिंकली 
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील अत्यंत अटीतटीच्या लढतीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या ४७ मतांनी फेर मतमोजणीनंतर विजयी झाले. त्यामुळे आधी विजयी घोषित झालेल्या उद्धव सेनेचे अमोल कीर्तिकारांना पराभव पत्करावा लागला. वायकर विजयी झाले तरी लोकांची मनं मात्र कीर्तिकर यांनी जिंकली.

Web Title: Both Shiv Sena Mumbai bosses; Waikars won the elections and Kirtikars won the hearts 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.