कारवाईच्या भीतीने दोघींनी घेतली इमारतीवरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:26 AM2018-04-12T05:26:06+5:302018-04-12T05:26:06+5:30
ग्रॅण्ट रोड येथे पोलीस छाप्यादरम्यान कारवाईच्या भीतीने देहविक्री करणाऱ्या दोन महिलांनी मंगळवारी रात्री इमारतीच्या तिस-या मजल्यावरून उडी घेतली. यात दोघींचाही मृत्यू झाला.
मुंबई : ग्रॅण्ट रोड येथे पोलीस छाप्यादरम्यान कारवाईच्या भीतीने देहविक्री करणाऱ्या दोन महिलांनी मंगळवारी रात्री इमारतीच्या तिस-या मजल्यावरून उडी घेतली. यात दोघींचाही मृत्यू झाला. सलमा उर्फ माया शेख (२५) आणि अंजीरा उर्फ सुमन शेख (४५) अशी मृत महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.
ग्रॅण्ट रोड येथील ओम पॅलेस या इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती डी.बी. मार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला. ही बाब तेथील महिलांना समजताच त्यांची पळापळ सुरू झाली. पोलीस इमारतीत आल्याचे लक्षात येताच इमारतीमध्ये राहात असलेल्या अंजीरा आणि सलमा यांनी इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीला दोरी बांधली. ड्रेनेज पायपाच्या आधाराने खाली उतरून पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सलमापाठोपाठ अंजीरा खाली उतरत होती. मात्र अंजीराचा हात सुटला आणि ती सलमाच्या अंगावर पडली. त्यामुळे दोघीही खाली कोसळल्या. घटनेची वर्दी मिळताच वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमी महिलांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
अंजीरा, सलमा या दोघीही मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी आहेत. त्या अनेक महिन्यांपासून या इमारतीत राहत होत्या.