मुंबई : ‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोन तरुणींनी लाखो रुपये गमविल्याची घटना नुकतीच पवईत घडली. एका नामांकित विमान कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून, त्या तरुणींकडून नासीर खान नामक व्यक्तीने लाखो रुपये उकळले. अखेर यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणींनी तक्रार दिली. या प्रकरणी पवई पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पवई परिसरात तक्रारदार २१ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. त्याच परिसरात १८ वर्षीय मैत्रीण मेघा (नावात बदल) राहते. दोघीही नोकरीच्या शोधात होत्या. याच दरम्यान मित्र-मैत्रिणींकडून मिळालेल्या माहितीनंतर मे महिन्यात त्यांनी एका अॅपवर नोकरीसाठी माहिती अपलोड केली. महिनाभराने नासीर खान नावाच्या व्यक्तीने एका नामांकित विमान कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून नोकरी देणार असल्याचे सांगितले.त्यांनी ज्या अॅपवर माहिती दिली होती त्यातही तो एचआर असल्याचे दाखवत होते. त्यामुळे दोघींचा त्यावर विश्वास बसला. दोघींना हवाई सुंदरी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. दोघींनीही हवाई सुंदरीचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला यासाठी त्याने प्रत्येकी १ लाखांचा खर्च होणार असल्याचे सांगितले. दोघींनीही त्याला होकार दिला. ठरल्याप्रमाणे १४ जूनला तो पैसे घेण्यासाठी घरी आला. सुरुवातीला त्याला नेहाने ३५, तर मेघाने २५ हजार रुपये दिले. काही दिवसांत विमान कंपनीकडून नियुक्तीचे पत्र येणार असल्याचे सांगून तो निघून गेला.
काही दिवसांनी नियुक्तिपत्र हाती पडले. त्यानंतर उर्वरित रक्कम त्यांनी आरोपीच्या खात्यात जमा केली. पुढे नियुक्तिपत्र घेऊन त्यांनी विमान कंपनीचे कार्यालय गाठले. तेव्हा ते पत्र बनावट असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. अशी कुठलीही व्यक्ती येथे नोकरीला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर खानही नॉट रिचेबल झाला. तरुणींनी भांडुप पोलिसांत तक्रार दिली.
असा आला ठग जाळ्यातदोघीही मैत्रिणींसोबत टिटवाळा परिसरात गेल्या असताना खान त्यांना दिसला. तेव्हा, चुलत भावाच्या मदतीने त्यांनी खानच्या मुसक्या आवळल्या. त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले. हा गुन्हा पवई हद्दीत घडला असल्याने गुन्हा पवई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पवई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.