बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: November 22, 2014 01:15 AM2014-11-22T01:15:27+5:302014-11-22T01:15:27+5:30
बनावट नोटा खारघरमध्ये विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली.
नवी मुंबई : बनावट नोटा खारघरमध्ये विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. हे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
नवी मुंबईत भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, उपनिरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने गुरुवारी खारघर बेलपाडा येथे सापळा रचला होता. तेथे आलेल्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे या नोटा आढळल्या. २ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीच्या या सर्व ५०० रुपयांच्या नोटा होत्या. पोलिसांनी या नोटांची खात्री पटवली असता त्या बनावट असल्याचे सिध्द झाल्याचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यानुसार ननदार शेख (२८) आणि रिजाउज शेख (३०) या दोघांना अटक करून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बनावट नोटा घेऊन ते कोलकाता येथून गीतांजली एक्स्प्रेसने आले होते. सुमारे तीन लाख रुपयांच्या या नोटा खारघरमध्ये विकल्या जाणार होत्या. त्यानुसार बनावट नोटा घेणाऱ्या व्यक्तीचीही माहिती मिळालेली असून त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त रणजित धुरे हे देखील उपस्थित होते. पाकिस्तान तसेच बांगलादेश येथून या बनावट नोटा भारतात येत असल्याचे मेंगडे यांनी सांगितले. साखळी पद्धतीने अनेकांमार्फत या भारतात येत असल्याने सापडणाऱ्या व्यक्तीलाही नोटा पुरवणाऱ्याची माहिती नसते. त्यामुळे बनावट नोटांचे रॅकेट उघड करण्यात अडचणी येत असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)