- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
मुंबई : सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) व त्यांचे वकील हरिश भांबानी (६५) यांची हत्या कांदिवलीच्याच एका गोदामात करून नंतर त्यांचे मृतदेह लालजीपाडा नाल्यामध्ये फेकण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. लालजीपाडा येथील गांधीनगरमधील औद्योगिक परिसरातील दुर्गामाता चाळ कमिटीच्या समोरील गाळ््यामध्ये विद्याधर राजभरच्या मालकीचा गाळा आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.असे घडले हत्याकांडविद्याधर राजभरच्या मालकीच्या गाळ्यात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’पासून विविध शिल्प तयार करण्याचे काम चालते. येथेच विद्याधर व त्याच्या चार साथीदारांनी हे हत्याकांड घडविले. नंतर विजय राजभर ऊर्फ विकास टेम्पोवाला याचा टेम्पो बुक केला. दोघांचे मृतदेह हे टाकाऊ सामान असल्याचे भासवत ते चालकाच्या मदतीने लालजीपाडा नाल्यात टाकले. मात्र दुसऱ्या दिवशी हे मृतदेह नाल्यात सापडल्याचे वर्तमानपत्रात झळकताच विकासने स्वत:हून पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी मुंबई व उत्तर प्रदेश पोलिसांनी मिळून विद्याधर राजभर ऊर्फ गोटू, विजय राजभर ऊर्फ विकास, शिवकुमार ऊर्फ साधू, देवेंद्र व प्रतीक या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे साधूने कबूल केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.