नौपाड्यातून दोघींची सुटका
By admin | Published: July 2, 2015 10:38 PM2015-07-02T22:38:57+5:302015-07-02T22:38:57+5:30
नौपाड्यातील सम्राट सोसायटी या इमारतीमध्ये दोन महिलांकडून शरीरविक्रीचा व्यवसाय करुन घेणाऱ्या आरती आचार्य (४७) या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक
ठाणे : नौपाड्यातील सम्राट सोसायटी या इमारतीमध्ये दोन महिलांकडून शरीरविक्रीचा व्यवसाय करुन घेणाऱ्या आरती आचार्य (४७) या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. तिच्याकडून ८३ हजार ५०० या रोकडसह ८४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सम्राट सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर ही महिला कुंटणखाना चालवित असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून धाड टाकण्यात आली. आरतीचा पतीही गुन्हेगार होता. त्याचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्यामुळे ही महिला हा व्यवसाय करीत होती. तिने या इमारतीमध्ये १४ हजार रुपये मासिक भाडे आणि एक लाख रुपये अनामत रक्कम देऊन हा व्यवसाय सुरु केला होता.
विशेष म्हणजे सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनाही याबाबत संशय आला नसल्यामुळे तिने हा प्रकार बिनधास्त सुरु ठेवला होता. पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद ठाकूर, उपनिरीक्षक शरद पंजे, कल्याणी पाटील आदींच्या पथकाने टाकलेल्या धाडीत गिऱ्हाईकासाठी स्वीकारलेली अडीच हजारांची रोकड तसेच ८१ हजार रुपये रोख आणि मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पिडीत महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात होता. या महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ठाणे न्यायालयाने ४ जुलैपर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुमन चव्हाण या याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)