सोसायटीत फ्लॅट विकत घेतला पण सभासद होत नाही, मेंटेनन्सही देत नाही, काय करावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:08 AM2023-12-06T06:08:50+5:302023-12-06T06:09:36+5:30
ज्याने दोन वर्षांपूर्वी सदनिका विकत घेतली आहे ती व्यक्ती सदनिका वापरते आहे; पण अजून जुने सभासदच संस्थेच्या दप्तरी सभासद म्हणून दिसत असावेत. हे चुकीचे आहे.
एका व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी नोंदणीकृत गृहरचना सोसायटीत फ्लॅट घेतला आहे. ती व्यक्ती सभासदही होत नाही आणि मेंटेनन्सही देत नाही. हा प्रश्न कसा सोडवावा? - एक वाचक
मुळातच सभासदांनी एकत्र येऊन स्वतःसाठी निवासाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केलेली असते. गृहनिर्माण संस्थेत सदनिका धारण करण्यासाठी संस्थेचे सदस्य असणे ही प्राथमिक अट असते. सदस्याला संस्थेच्या परवानगीशिवाय सदनिकेची विक्री करता येत नाही. आपण सांगता त्या व्यवहारात ज्या सदस्याने आपली सदनिका एका बाहेरच्या व्यक्तीला विकलेली आहे तिने संस्थेच्या संचालक मंडळाच्या संमतीशिवाय आपल्या सदनिकेची विक्री केलेली दिसते आहे. जुन्या सभासदाने आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन त्या जागी नव्या व्यक्तीला सभासदत्व दिले जाणे आवश्यक होते. त्या व्यवहाराला सोसायटीची संमती घेणे आवश्यक होते. तसे झालेले दिसत नाही. ज्याने दोन वर्षांपूर्वी सदनिका विकत घेतली आहे ती व्यक्ती सदनिका वापरते आहे; पण अजून जुने सभासदच संस्थेच्या दप्तरी सभासद म्हणून दिसत असावेत. हे चुकीचे आहे.
आपण जुन्या सभासदाला या त्रुटीची सविस्तर कल्पना द्यावी आणि सदस्यत्व सोडण्याचा त्यांचा अर्ज घेऊन नव्या व्यक्तीला सदस्यत्व द्यावे. असे करताना आपण सांगता त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करवून घेता येईल. संबंधित दोघांनी हे करायला नकार दिला तर तांत्रिकदृष्ट्या आता सदनिका वापरणारी व्यक्ती ही अनाधिकाराने जागा वापरते आहे. (trespassing) असा त्याचा अर्थ होईल. नव्याने सदनिकेचा वापर करणाऱ्या व्यक्तीला सभासद होण्यास भाग पाडण्यासाठी सोसायटीकडे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही जुना सभासद आणि नव्याने सदनिका घेणारी व्यक्ती अशा दोघांना नोटिसा देऊ शकता. आपली संस्था ही सहकारी गृहनिर्माण संस्था असेल तर आपण सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकता किंवा न्यायालयीन कारवाई करू शकता. चर्चा आणि संवाद साधण्याचे मार्ग उपयुक्त न ठरल्यास कायदेशीर कारवाईचा मार्ग वापरणे योग्य ठरेल.
ग्राहक प्रबोधन आणि संशोधन संस्था, नाशिक
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com