Join us  

घर घेतले, पण प्रश्न पडले; आता प्रश्नांची उत्तरेही मिळणार! घर खरेदीदार आणि बिल्डरांचे होणार समुपदेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 10:19 AM

घर नोंदणी केल्यानंतर कालावधीत घराचा ताबा मिळाला नाही, घराची गुणवत्ता बरोबर नाही, प्रकल्प पूर्ण होण्यात अडचणी असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्राहक महारेराकडे दाद मागतात.

मुंबई : घर खरेदीदारासमोर घराची नोंदणी केल्यानंतर त्यात निर्माण होणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आता  महारेराने व्यवस्था केली आहे. यासाठी महारेराने बीकेसी, वांद्रे पूर्व भागातील मुख्यालयात समुपदेशन  यंत्रणा कार्यान्वित केली आहे. महारेराच्या मुख्यालयात चौथ्या मजल्यावर समुपदेशन गटाचे कार्यालय असणार असून, कार्यालयीन वेळेत सेवांचा लाभ घेता येणार आहे.

घर नोंदणी केल्यानंतर कालावधीत घराचा ताबा मिळाला नाही, घराची गुणवत्ता बरोबर नाही, प्रकल्प पूर्ण होण्यात अडचणी असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्राहक महारेराकडे दाद मागतात. त्यासाठी महारेराकडे अर्ज कसा करायचा, त्याबाबतीत काय काळजी घ्यायची ? याबाबत समुपदेशकांकडे आल्यानंतर हे समुपदेशक त्यांना तक्रार दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतील. बाधित  ग्राहकांना तक्रार कशी दाखल करायची, तक्रारीची स्थिती काय, सुनावणी कधी आहे आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सध्यस्थिती काय ? अशा बाबी समुपदेशकांकडून समक्ष भेटून समजून घेण्याची  सोय होणार आहे.

प्रश्न विकासकांसमोरही... -- नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी महारेराकडे करणे विकासकांना बंधनकारक आहे. महारेराकडे  प्रकल्पाची नोंदणी कशी करायची आणि  त्यानंतर रेरा कायद्यानुसार वेळोवेळी कुठल्या बाबींची पूर्तता करावी लागते.- दर ३ महिन्याला प्रकल्पाशी संबंधित कुठली माहिती अद्ययावत करावी लागते.- घर खरेदीदारांकडून घर नोंदणीपोटी आलेल्या पैशांचा कसा हिशेब ठेवायचा, याचे लेखा परीक्षण कसे आणि कधी करून घ्यायचे ? या बाबी समुपदेशकांना भेटून विकासक समजून घेऊ शकतात.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन