- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले रोहित कुमार (३१) हा विद्यार्थी महिनाभर दुबई फिरायला गेला होता. तिथून त्याने दोन महागडे आयफोन खरेदी केले. ज्यातील एक फोन त्याच्या सोबत हॉटेल रूम शेअर करणाऱ्या अनोळखी विमान प्रवाशाने चोरल्याचा संशय असून याप्रकरणी त्याने सहार पोलिसात धाव घेतली. तेव्हा अमीन बेग नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहितने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तो २८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता विमान क्रमांक GF-64 ने दुबई वरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याठिकाणी आला. त्याने दुबईमध्ये जे दोन फोन खरेदी केले होते ते फोन त्याच्या बॅगेत होते. प्रवासादरम्यान त्याची बेग सोबत ओळख झाली आणि मुंबईत पोहोचल्यावर त्याच्याकडे पैसे नसल्याने हॉटेल बुक करून देण्याची विनंती त्याने रोहितला केली. तेव्हा रोहितने अंधेरी पूर्वच्या मरोळ नाका परिसरात असलेल्या खाजगी हॉटेलमध्ये रूम बुक केले आणि आपण एकत्रच या ठिकाणी राहू असे बेगला सांगितले.
हॉटेलमध्ये आल्यानंतर देखील रोहितने नवे फोन पुन्हा तपासले आणि बॅगेत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता हॉटेलमधून चेक आउट करत गोरखपुरला जाण्यासाठी विमानतळाच्या दिशेने रोहित निघाला. मात्र बेग हा हॉटेल रूममध्येच होता. विमानतळावर पोहोचल्यानंतर बॅग चेकिंग दरम्यान त्याने सदर दोन फोन तपासले मात्र त्यातील एक फोन गायब होता. म्हणून रोहितने बेगला वारंवार फोन केले. पण त्याने ते रिसीव न करता फोनच स्विच ऑफ केला. तेव्हा रोहितने हॉटेल कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले आणि बेगने चेकआउट केल्याचे रोहितला समजले. त्यानुसार याप्रकरणी रोहितने बेग विरोधात सहार पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करवला असून अधिक तपास सुरू आहे.