Join us

एसी लोकलमध्ये ‘बाउन्सर’

By admin | Published: April 09, 2016 3:45 AM

मुंबईत एसी लोकल दाखल झाली असून, चाचण्यांनंतर लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे. मात्र या लोकलचे असणारे स्वयंचलित दरवाजे आणि त्यातील गोंधळ टाळण्यासाठी

मुंबई : मुंबईत एसी लोकल दाखल झाली असून, चाचण्यांनंतर लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे. मात्र या लोकलचे असणारे स्वयंचलित दरवाजे आणि त्यातील गोंधळ टाळण्यासाठी बाउन्सर नेमण्याची अजब शक्कल मध्य रेल्वेकडून आखण्यात आली आहे. हे बाउन्सर म्हणून रेल्वे पोलीसही आपली भूमिका बजावण्याची शक्यता असल्याचे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद म्हणाले. एसी लोकलची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. तब्बल ५५ कोटी रुपये किंमत असलेली ही लोकल सध्या मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आहे. पहिली लोकल दाखल झालेली असतानाच आणखी ९ लोकलची बांधणीही आयसीएफमध्ये करण्यात येणार आहे. पहिली लोकल प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत आणल्यानंतर लोकलमध्ये चढ-उतार करताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मेट्रोप्रमाणेच बाउन्सर नेमण्याची योजना आखली आहे. प्लॅटफॉर्मवर प्रत्येक डब्याजवळ हे बाउन्सर असतील. हे बाउन्सर म्हणून रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि गव्हर्मेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) तैनात केले जाऊ शकतात. एसी लोकलचे दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होऊ शकणार नाही आणि एखादा प्रवासी दरवाजाजवळील फुटबोर्डाकडे उभा राहिल्यास दरवाजा बंद होऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणि होणारी अडचण लक्षात घेता ही योजना आखण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)