Join us

संक्रमण शिबिरात बाउन्सरची एन्ट्री; मुलुंडमधील प्रकार, विकासक रहिवाशांत वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 5:45 AM

मुलुंड पूर्वेकडील न्यू पीएमजीपी को-ऑप सोसायटीचा १३९९ घरांचा रिचा डेव्हलपर्सकडून पुनर्विकास सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत निम्मे आयुष्य संक्रमण शिबिरात घालविणाऱ्या मुलुंड पूर्वेकडील म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑप. सोसायटीच्या रहिवाशांचा विकासकांच्या बाउन्सरशी झालेला वाद शुक्रवारी पोलिस ठाण्यात पोहोचला. हक्काच्या घरांबाबत लेखी आश्वासन न देता दडपशाहीने घरे रिकामी करण्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

मुलुंड पूर्वेकडील न्यू पीएमजीपी को-ऑप सोसायटीचा १३९९ घरांचा रिचा डेव्हलपर्सकडून पुनर्विकास सुरू आहे. १९ जून २००७ मध्ये झालेल्या करारनामानुसार, ३६ महिन्यांत नवीन घरांचा ताबा देण्याचे नमूद होते. येथील रहिवाशांना २०१० मध्ये संक्रमण शिबिरात हलविण्यात आले. जवळपास ७०० हून अधिक जणांना नवीन घरातचा ताबा मिळाला. उर्वरितांपैकी २९८ जण अन्य ठिकाणी भाडेतत्त्वावर आहेत, तर ३०० हून अधिक कुटुंब आजही याच संक्रमण शिबिरात राहण्यास आहे. विकासक, म्हाडाकडून इमारत धोकादायक असल्याचे सांगून घरे रिकामी करण्याचा तगादा लावला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. स्थानिक रहिवासी स्नेहल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी विकासकाचे बाउन्सर घरात घुसून खिडकी, दरवाजे तोडू लागले. त्याला विरोधात करताच काहींनी शिवीगाळ करत धक्काबुकी केली.  दोघांनीही पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडूनही गुन्हा टाळाटाळ केल्याचाही आरोप केला आहे.

आरोप खोटेकाही वर्षे काम बंद होते. आम्ही पाठपुरावा करत काम सुरू केले आहे. सध्या संक्रमण शिबिरातील घरांची स्थिती धोकादायक आहे. याबाबत वेळोवेळी नोटीस धाडून रहिवाशांना सांगण्यात आले आहे. मात्र, काही निवडक व्यक्तींच्या गोंधळामुळे विकासात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली नसून सर्व आरोप खोटे आहेत.    - उमेश कांबळी,    वरिष्ठ उपाध्यक्ष, रिचा डेव्हलपर्स

कारवाई होत आहे ...रहिवासी आणि बाउन्सरमध्ये झालेल्या वादाबाबत अधिक चौकशी सुरू आहे. त्यानुसार, योग्य ती कारवाई करण्यात येईल.    - सुनील कांबळे, वरिष्ठ पोलिसनिरीक्षक, नवघर पोलिस ठाणे

लेखी आश्वासन द्या...आधीच प्रकल्प एवढी वर्षे रखडला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना थेट घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करणे चुकीचे आहे. किती वर्षात हक्काच्या घराचा ताबा देणार, काय सुविधा देणार याचे  लेखी आश्वासन देणे गरजेचे आहे.- नागेश होकळे, स्थानिक रहिवासी