‘बॉक्स ८’च्या खानसाम्याला अटक
By admin | Published: April 18, 2016 01:48 AM2016-04-18T01:48:39+5:302016-04-18T01:48:39+5:30
विद्यार्थी विषबाधा प्रकरणी बॉक्स ८ च्या ठाणे शाखेतील गोपाल भूषण (३६) या खानसाम्याला खार पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : विद्यार्थी विषबाधा प्रकरणी बॉक्स ८ च्या ठाणे शाखेतील गोपाल भूषण (३६) या खानसाम्याला खार पोलिसांनी अटक केली आहे.
मूळचा नेपाळ येथील रहिवासी असलेला भूषण सध्या विक्रोळीमध्ये राहतो. गेल्या अनेक वर्षांपासून बॉक्स ८ च्या ठाणे शाखेत तो खानसामा म्हणून काम करतो. गुरुवारी वांद्रे येथील थाडोमल शहानी महाविद्यालय, हाजीअली येथील लाला लजपतराय महाविद्यालय, व्हिसलिंग वूड्स, चर्चगेट येथील केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन २०१५-१६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येथील कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॉक्स ८ च्या ठाणे शाखेतून राजमा आणि भाताचे बॉक्सेस आॅनलाइन मागविण्यात आले होते. या ठिकाणी खाद्य पदार्थ वेळेवर पोचविण्याची जबाबदारी भूषणकडे सोपविण्यात आली होती.
खाद्य पदार्थांचे बॉक्स पाठवण्यासाठी उशीर झाल्याने भूषण याने गरम अन्न प्लास्टिक बॉक्समध्ये भरले. ते गरम असल्याने थेट प्लास्टिक कंटेनरमध्ये टाकणे चुकीचे होते. मात्र उशीर झाला असल्याने त्याने दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले. या पदार्थांचे सेवन केल्याने १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती खार पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)