बॉक्स सिनेमाने बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रसारित केला ‘जंजीर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:05 AM2021-01-14T04:05:12+5:302021-01-14T04:05:12+5:30
गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या बॉक्स सिनेमाने निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा ...
गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या बॉक्स सिनेमाने निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांची परवानगी न घेता जंजीर चित्रपट प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग अधिक तपास करीत आहे. जंजीरसारखे अनेक चित्रपट त्यांनी प्रसारित केल्याची शक्यता असून त्याबाबतही तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेने मंगळवारी बॉक्स सिनेमा वाहिनीच्या मालाड येथील कार्यालयात छापा घालून सर्व्हरसह अन्य कागदपत्रे, उपकरणे जप्त केली. मेहरा यांनी १९७३ मध्ये जंजीर चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे स्वामित्व हक्क मेहरा कुटुंबीयांकडे आहेत. मात्र बॉक्स सिनेमाने परवानगी न घेता चित्रपट प्रसारित केला. याविरोधात मेहरा यांच्या मुलाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली हाेती. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घनश्याम गिरी, मोहम्मद बिलाल मोहम्मद गफार शेख या दोघांना अटक केली.
हा गुन्हा पुढील तपासासाठी १ जानेवारीपासून गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे (सीआययू) वर्ग करण्यात आला. त्यानुसार सीआययूने अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, सीआययूने बॉक्स सिनेमाचे संस्थापक नारायण शर्मा यांना टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार १९९८ पासून सुरू होता. चौकशीदरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार व्हीआयपी फिल्म्स, सोनम म्युझिक, हजरा फिल्म्स, झोया फिल्म्सकडून ही बनावट कागदपत्रे घनश्याम गिरी नावाच्या व्यक्तीकडे आली. गिरीकडून ती बॉक्स सिनेमाचे संस्थापक शर्मा यांना मिळाली. त्यानंतर शर्मा यांनी चित्रपट प्रसारित केला हाेता.
...........................................