बॉक्स ड्रेन, मायक्रो टनेलिंग करणार पाण्याचा उपसा; मुंबईतील सहा सखल भागांत पालिकेकडून उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 01:05 PM2023-06-04T13:05:49+5:302023-06-04T13:06:54+5:30
पावसाळ्यात पाणी साचून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येऊ नये यासाठी प्रशासन विविध विभागामार्फत नियोजन करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यात पाणी साचून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येऊ नये यासाठी प्रशासन विविध विभागामार्फत नियोजन करत असून, पर्जन्य जलवाहिन्यांमार्फतही मोठी व आव्हानात्मक विविध कामे हाती घेतली आहेत. अतिसखल भागात पाणी साचू नये म्हणून आरसीसी बॉक्स ड्रेन, मायक्रो टनेलिंग, फ्लड गेट, पाणी साठवण टाक्या, मिनी पंपिंग स्टेशन यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा जलद उपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा हिंदमाता, भरणी नाका (वडाळा अग्निशमन केंद्र) भायखळा, शीव (सायन) आणि माटुंगा स्थानक, महालक्ष्मी स्थानक, नायर रुग्णालय या अतिशय सखल परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
- पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येत असून, या सर्व कामांचा परिणाम येत्या पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना परिणामकारक स्वरूपात दिसून येईल, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.
नागरिकांना मिळणार दिलासा
महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्टपासून डॉ. ई. मोजेस मार्गावरील फेमस स्टुडिओ बसथांब्यापर्यंत जी दक्षिण विभागाच्या हद्दीतील कामात डबल बॅरल बॉक्स ड्रेनमधून या वाहिन्या घातल्या आहेत. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम रेल्वेच्या आवारात मिनी पंपिंग स्टेशन उभारले आहे. या ठिकाणी ताशी तीन हजार घनमीटर क्षमतेचे सबमर्सिबल पंप बसविले असून, हे मिनी पंपिंग स्टेशन २०२२ च्या पावसाळ्यापासून कार्यान्वित केले आहे. यंदा त्याच्या विस्तारामुळे अतिवृष्टीदरम्यान पाणी साचण्यापासून निश्चित मोठा दिलासा मिळेल.
नायर रुग्णालय तसेच, मोरलँड मार्ग, एम. ए मार्ग, मराठा मंदिर जंक्शन, जेकब सर्कल (सात-रस्ता) या ई आणि जी/ दक्षिण विभागातील सखल परिसरात जास्त पाऊस झाल्यानंतर वारंवार पाणी साचते. या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने १२०० मिमी व्यासाच्या दोन वाहिन्या घातल्या आहेत.