ओम्कार गावंड
मुंबई : चेंबूरच्या मरावली चर्च परिसरातील नालंदानगर येथे राहणाºया राहुल घोडके (२५) या तरुणाची भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)मध्ये निवड झाली आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील केंद्रात सॅटेलाइटच्या विद्युत पुरवठा विभागात तंत्रज्ञ पदासाठी त्याची निवड झाली. वडिलांचे निधन; त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची, आई घरकाम व कॅटरर्समध्ये काम करून संसार चालवायची. अशा परिस्थितीतही कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि मेहनतीच्या जोरावर राहुलने इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले.
राहुलचे पाचवीपर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत व दहावीपर्यंतचे शिक्षण जवाहर विद्याभवन शाळेत झाले. वडील मोलमजुरी करून पैसे कमवत असल्याने राहुलचे शालेय शिक्षण अत्यंत गरिबीत पूर्ण झाले. दहावी पास झाल्यानंतर राहुलच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याच्या आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. आईने घरकाम व कॅटरर्समध्ये काम सुरू केले. राहुलने शिक्षण थांबवून २ वर्षे नोकरी केली. बहिणीचे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुलच्या पुढील शिक्षणाकरिता त्याच्या बहिणीने त्याला सहकार्य केले. त्याने गोवंडी येथे आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. गोवंडी आयटीआयमधून त्याने पहिला क्रमांक पटकावला. आयटीआयच्या जोरावर लार्सन अँड टुब्रो पवई येथे त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर त्याने व्हीजेटीआय महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून अव्वल श्रेणी प्राप्त करून डिप्लोमा पूर्ण केला व एका नामांकित कंपनीमध्ये तो नोकरीला लागला. डिप्लोमा करीत असतानाच राहुल इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न पाहत होता व त्यादृष्टीने त्याचा अभ्यास सुरू होता. २०१८ मध्ये इस्रोमध्ये त्याने अर्ज केला. पूर्व परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षेनंतर त्याची मुलाखत पार पडली. आणि राहुलची इस्रोमध्ये निवड झाली. जेव्हा मला कळलं की राहुलची निवड इस्रोमध्ये झाली आहे, त्या वेळी आनंद गगनात मावत नव्हता. कारण त्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं आहे, अशी भावना राहुलची बहीण दर्शना घोडके-त्रिमुखे हिने व्यक्त केली. राहुलची आई शारदा घोडके म्हणाल्या, २०१० मध्ये राहुलच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मी घरकाम व कॅटरर्समध्ये काम करून मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. राहुलचं पहिल्यापासून इस्रोमध्ये जण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं कठोर मेहनत घेतली. खूप अभ्यास केला. आज मला त्याचा अभिमान वाटतो आहे.