पतंग पकडताना चिखलात बुडून मुलाचा मृत्यू
कांदिवलीतील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पतंग पकडण्याच्या नादात गुरुवारी दुपारी चिखलात बुडून एका मुलाला जीव गमवावा लागला. दुर्गेश जाधव (१०) असे मृत मुलाचे नाव आहे.
दुर्गेश हा कांदिवलीतील भाब्रेकर नगरमध्ये राहत असून डहाणूकरवाडीला त्याच्या आईसोबत आजीच्या घरी राहायला आला होता. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पतंग पकडण्यासाठी धावताना डहाणूकरवाडीतील तबेल्याशेजारील चिखलात तो पडला. येथे काम सुरू असल्याने चारही बाजूने पत्रे लावण्यात आले आहेत. जवळच्या एका इमारतीवर एक व्यक्ती काम करत होता, त्याने दुर्गेशला पाहिले आणि आरडाओरड केली. मात्र, त्याचा आवाज कोणीही ऐकला नाही. ताे इमारतीवरून खाली उतरला आणि दुर्गेशला वाचविण्यासाठी फळी तसेच बांबू आत घालून त्याचा शोध घेऊ लागला. त्याचा आवाज ऐकून इमारतीत क्रेनने सामान वर चढविणाऱ्यांनी त्या दिशेने ती वळवली. क्रेनच्या मदतीने दुर्गेशला वर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याच्या नाकातोंडात चिखलातील शेण गेले आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मुलाला चिखलाचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडला असावा, दरम्यान या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
......................