मुंबई : लहान मुलांमध्ये सध्या वेड असलेल्या प्रसिद्ध ‘पबजी’ या मोबाइल गेमवर बंदी घालण्यात यावी, यासाठी एका ११ वर्षीय मुलाने गुरुवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या गेममुळे हिंसेला आणि आक्रमकतेला चालना देण्यात येत आहे, असे आहद निझाम याने याचिकेत म्हटले आहे.आहद याने त्याच्या आईद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारला या गेमवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. तसेच अशा हिंसक गेम्सवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारला आढावा समिती नेमण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती केली आहे. प्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड (पबजी) हा आॅनलाइन गेम असून एका वेळी अनेक जण तो खेळू शकतात. एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा गेम्सबाबत चिंता व्यक्त केली होती. मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
‘पबजी’वर बंदीसाठी मुलाची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 5:45 AM