लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पश्चिम परिसरात साई अनिल भरणकर (११) या मुलाला त्याचा डावा डोळा कायमचा गमवावा लागणार आहे. दिवाळीत मित्रांसोबत फटाके फोडताना त्याच्या ठिणग्या डोळ्यात गेल्याने हा प्रकार घडला. यात त्याच्या नाकाला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सहा टाके पडले असून डी एन नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
भरणकर हा तो गिल्बर्ट हिल रोड अंधेरी पश्चिम येथील धनगरवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरणकर त्याच्या घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. त्याची आई कोमल भरणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजता जेवण करून भरणकर आपल्या मित्रांसोबत फटाके फोडण्यासाठी घराबाहेर पडला. तो रस्त्याच्या एका कोपऱ्यावर उभा असताना त्याच्या मित्रांनी फटाका फोडला, त्यातून ठिणग्या पडल्या. ज्या ठिकाणी ते फटाके फोडत होते ती गल्ली खूपच लहान असल्याने काही त्यांच्या मुलाच्या डोळ्यात गेल्या.
काही स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टर त्याला तपासत जेजे रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथील डॉक्टरांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या पण त्याचा एक डोळा कायमचा निकामी झाला. त्याच्या नाकावरही जखमा झाल्याने अजूनही उपचार सुरू आहेत. त्याला नीट बोलताही येत नसल्याने पोलिसांनी अद्याप त्याचा जबाब नोंदविलेला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि त्याला दुखापत कशी झाली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. याप्रकरणी आम्ही अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मुलाचे जबाब नोंदवल्यानंतर आम्ही कारवाई करू