खलील गिरकर
मुंबई : दिवाळीनिमित्त करी रोड येथील आजोळी आलेला अडीच वर्षीय बालक लोकलच्या आकर्षणातून इमारतीमधून कुटुंबीयांचा डोळा चुकवून थेट करी रोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर गेला. तेथे लोकल पाहण्यात दंग झाला. त्याला स्वत:बाबत काहीच सांगता येत नव्हते. जीआरपी हवालदारांच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. मुलगा हरवल्याने रडारड सुरू असलेल्या कुटुंबीयांनी मुलगा सुरक्षित घरी आल्याचे पाहताच जणू दिवाळीच साजरी केली.
बदलापूर येथे सासरी राहणारी महिला दिवाळीनिमित्त करी रोड येथील माहेरी आली होती. रेल्वे स्थानकाजवळील इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील घरामध्ये कुटुंबीयांचा गोतावळा जमला होता. मंगळवारी दुपारी लहान मुले-मुली खेळण्यासाठी घराबाहेर गेली. त्यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगादेखील खाली गेला. भावंडांची नजर चुकवून तो कधी रेल्वे स्थानकात गेला, हे कुणालाही कळले नाही. रेल्वे स्थानकात फलाटावर गेल्यावर तो लोकल बघण्यात दंग झाला. थोड्या वेळाने फलाटावर फिरू लागला. एका प्रवाशाने त्याबाबत जीआरपीचे पोलीस हवालदार नितीन खोत यांना माहिती दिली. खोत यांनी महिला हवालदार जयश्री जयस्वार यांच्यासोबत त्या मुलाची चौकशी केली. मात्र, मुलगा लहान असल्याने त्याला माहिती देता येत नव्हती. विशेष म्हणजे, तो रडत नव्हता, तर गाड्या आल्यावर त्या पाहून आनंद घेत होता.
खोत यांनी त्याला कार्यालयात नेऊन बिस्कीट व चॉकलेट दिले. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही माहिती मिळत नसल्याने, रेल्वे स्थानकात उद्घोषणा करण्यात आली. त्यानंतरही कुणीही त्याला न्यायला आले नाही. खोत यांना हा मुलगा आजूबाजूच्या परिसरातील असावा, असा संशय आला. त्यांनी त्याला सीएसएमटी दिशेच्या पुलावर आणल्यानंतर, तो खाली मैदानाच्या दिशेने हात दाखवू लागला. त्यामुळे त्याला मैदानात आणण्यात आले व परिसरात त्याबाबत चौकशी करण्यात आली, तरीही काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे रस्त्याच्या दिशेने जाण्याचा निर्णय खोत यांनी घेतला. दरम्यान, रस्त्याजवळ एका तरुणाने बाजूच्या इमारतीत लहान मुलाचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आणि त्यामुळेच अवघ्या पाऊण तासात मुलाच्या घराचा पत्ता मिळाला.आईने मायेने जवळ घेतलेपोलीस मिळालेल्या माहितीनुसार त्या इमारतीत गेले. घरात रडारड सुरू होती. मुलाला सुखरूप पाहताच आई, आजी व मावशीने त्याला मायेने जवळ घेतले. खोत व जयस्वार दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे जवान योगेश कुमार, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे भरत मालुसरे व दिनकर चव्हाण यांनी या मुलाला घरी पोहोचविण्यात सहकार्य केले. त्यांच्या हुशारीमुळेच मुलगा सुखरूप घरी आल्याने कुटुंबाने त्यांचे आभार मानले.