पनवेल : देशभरात सोशल मीडियावर चिनी उत्पादनाविरोधात बहिष्काराचे वारे जोरात वाहत आहे. खारघर येथील सार्वजनिक नवरात्रौत्सवात लेवा पाटीदार समाजाच्या शेकडो बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक शपथ घेऊन चिनी बनावटीच्या मालावर बहिष्काराचा निर्णय घेतला. खारघर सेक्टर १९ मधील श्री सौराष्ट्र लेवा पाटीदार समाज बांधवांनी हातात मेणबत्ती घेऊन चायनामेड वस्तू विक्र ी अथवा खरेदी करणार नाही ही शपथ घेतली. यावेळी बहिष्काराचे फलकही झळकवण्यात आले. भारताच्या जवानांवर उरी येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत हा वाद चिघळला. मात्र या परिस्थितीत चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये चीनच्या भूमिकेबाबत नाराजी आहे. भारतात चिनी बनावटीची कोट्यवधींची उत्पादने विकली जातात. या उत्पादनामुळे चीनला मोठा आर्थिक नफा होतो. त्यामुळे व्यापारी उद्योगात अग्रेसर असलेला लेवा पाटीदार समाजाने चिनी उत्पादनावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे समाजाचे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. यावेळी लेवा पाटीदार समाजासह इतर समाजबांधवही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार
By admin | Published: October 11, 2016 3:09 AM