मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी रविवारपासून शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने, आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा काढल्यानंतर, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अधिवेशन संपल्यानंतरही आश्वासन पूर्तता झाली नसल्याने, कृती समितीने हा निर्णय घेतल्याचे कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उटाणे म्हणाले की, ‘अंगणवाडी कर्मचाºयांच्या सर्व संघटनांनी एकत्रित येत शासनाविरोधात भूमिका घेतली आहे. या भूमिकेनुसार शासकीय बैठकांवर कर्मचारी बहिष्कार टाकतील, शिवाय प्रत्येक महिन्याला अंगणवाडीतून शासनाला सादर होणारा अहवालही कर्मचारी रोखून धरतील. त्यामुळे बालविकासाची कोणतीही माहिती शासन स्तरापर्यंत पोहोचणार नाही. याउलट लहान मुलांचे नुकसान होऊ नये, म्हणून अंगणवाड्यांतील कामे सुरूच ठेवली जातील. मात्र, या कामकाजाची माहिती शासनापर्यंत पोहोचविली जाणार नाही.’या आधी मंगळवारी, २५ जुलैला आझाद मैदानात हजारोंचा धडक मोर्चा काढत, कृती समितीने सरकारला ११ सप्टेंबरनंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत, खुद्द पंकजा मुंडे आझाद मैदानात आल्या होत्या. त्यावेळी भाषणात आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, आश्वासन देऊन दोन आठवडे उलटल्यानंतर अधिवेशनाची सांगता झाली. तरीही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून मागण्या मान्य झाल्या नसल्याने, कृती समितीने बहिष्कार आंदोलन उभारले आहे. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यारही उपसणार असल्याचे उटाणे यांनी सांगितले.
अंगणवाडी कर्मचाºयांचा शासकीय कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 6:00 AM