Join us

ब्रॅन्डेड दुधावर बहिष्कार सुरूच

By admin | Published: May 21, 2015 2:13 AM

कमिशन वाढीसाठी ब्रन्डेड दूध कंपन्यांवर विक्रेत्यांनी उगारलेले बहिष्काराचे आंदोलन बुधवारपासून पुन्हा सुरू झाले.

मुंबई/ठाणे : कमिशन वाढीसाठी ब्रन्डेड दूध कंपन्यांवर विक्रेत्यांनी उगारलेले बहिष्काराचे आंदोलन बुधवारपासून पुन्हा सुरू झाले. त्यामुळे गोकूळ, अमुल आणि मदर डेअरी या तिन्ही कंपन्यांच्या एकट्या ठाणे शहरातच सुमारे दोन लाख लीटर दुधाची खरेदीच न झाल्यामुळे एकाच दिवसात करोडो रुपयांचा फटका या कंपन्यांना बसला आहे. तर ग्राहकांनाही या दूधासाठी भटकंती करावी लागली.एकीकडे नाममात्र दरामध्ये शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करायचे. त्यावर प्रक्रीया करून ती ब्रॅन्डेडच्या नावाखाली चढ्या भावाने विक्री करायची. डिझेलचे भाव वाढले की, दुधाच्या एमआरपीमध्ये वाढ करायची. पण प्रत्यक्षात जो विक्रेता भल्या पहाटेपासून दूध खरेदी करून रोख रकमेत महिनाभराच्या उधारीवर ग्राहकांपर्यंत दूध उपलब्ध करून देतो, त्याला मात्र कवडीमोल कमिशन देऊन बोळवण करायची. पुन्हा त्याच्या माफक मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. याऊलट दुधाच्या मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी मात्र वारेमाप खर्च करायचा. असे आडमुठे धोरण ठेवणाऱ्या दूध कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी ठाण्यातील १,२०० विक्रेत्यांनी एकत्रित येऊन लढा तीव्र केल्याने नामांकित म्हणविणाऱ्या सर्वच दूध कंपन्यांचे पितळ उघडे पडले आहे. आधी अमुल, वारणा, गोकूळ, महानंद आणि मदर डेअरी या पाचही कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर वारणा आणि महानंदने सकारात्मक चर्चेची तयारी दर्शविली. महानंद, वारणा, आणि गोकूळने त्यानिमित्ताने पुन्हा दुधाच्या दरात वाढ केली. महानंदने विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये थोडी वाढ केली असली तरी गोकूळने अजूनही ताठर भूमिका घेतली आहे. तर वारणामधून अजूनही ठोस चर्चा होऊ शकलेली नाही. या सर्वच वादामध्ये विक्रेत्यांप्रमाणे ग्राहकही भरडले जात आहेत.जोपर्यंत किमान किरकोळ किमतीवर विक्रेत्यांना १० टक्के कमिशन दिले जात नाही, तोपर्यंत दूध विक्रीवरील बहिष्कारावर ठाम असल्याचे ठाणे शहर दूध विक्रेते कल्याणकारी संघाचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. यांनी दिली आहे. सध्या बहिष्कार टाकण्यात आलेल्या गोकूळचे ठाणे शहरात ७५ हजार लीटर, अमुलचे एक लाख तर मदर डेअरीच्या २५ हजार लीटर दुधाची रोज विक्री होते. बुधवारी यातील ७० टक्के दूध विक्रीच न झाल्याने करोडो रुपयांचा फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)नामांकित कंपन्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार टाकून दूध विक्रेते कमिशनवाढीची मागणी करीत आहेत. मात्र दुधाची दरवाढ करून दूध कंपन्या कमिशनवाढीचा भार ग्राहकांवर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबई ग्राहक पंचायतीने दूध कंपन्यांच्या या प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विरोध दर्शवला आहे.च्बहुतेक नामांकित दूध कंपन्यांकडे दूध वितरणासाठी स्वत:चे जाळे नाही. त्यामुळे दूध वितरणात वाढलेल्या वितरकांच्या साखळीमुळे किमतीत अवास्तव वाढ होत असल्याचे पंचायतीने तक्रारीत म्हटले आहे. परिणामी दूध वितरणात येणारा रास्त खर्च पाहता दुधाची अंतिम किंमत ठरवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी पंचायतीने केली आहे. शिवाय या समितीने चार महिन्यांत दूधपुरवठ्यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर करून योग्य तोडगा काढण्याचे आवाहन पंचायतीने केले आहे.च्याआधी वैध मापनशास्त्र विभागाने एमआरपीहून अधिक किंमत वसूल करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली होती. मात्र अपुऱ्या कमिशनमुळे एमआरपीहून अधिक किमतीने दूध विक्री करावी लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे होते. परिणामी विक्रीवर विक्रेत्यांच्या संघटनेने बहिष्कार टाकला होता. मात्र या कंपन्यांनी एमआरपीमध्ये वाढ करीत विक्रेत्यांना कमिशनवाढ दिली. त्यामुळे इतर दूध कंपन्यांकडूनही दरवाढ होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र त्याचा विपरीत परिणाम गरिबांच्या दूध खरेदीवर होऊन दुर्बल घटकांतील कुपोषणाची समस्या अधिक गंभीर होण्याची भीतीही पंचायतीने व्यक्त केली आहे.