Join us

सोशल मीडियामुळे वाढला ‘बॉयकॉट’चा ट्रेंड; फायदा होतो की नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:53 AM

हे अस्त्र किती प्रभावी? : फायदा होतो की नुकसान?

संजय घावरे

मुंबई : सोशल मीडियावर बिग बजेट चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. ‘लालसिंग चढ्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’नंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ वर मात्र ही मात्रा चालली नाही. ‘बॉयकॉट’चे हे अस्त्र चित्रपटाला खरोखर नुकसान पोहोचवते की, फायदाही करून देते हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.

सोशल मीडियावर बॉयकॉटचे लोण पसरवून बिग बजेट चित्रपटांवर बहिष्काराचे आवाहन केले जाते आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम चित्रपटांना भोगावे लागतात. ‘लालसिंग चढ्ढा’ याचे ताजे उदाहरण आहे. याखेरीज ‘पीके’, ‘दंगल’, ‘शमशेरा’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘दोबारा’ अशा बऱ्याच चित्रपटांनी बहिष्काराचा प्रहार सहन केला आहे. धर्माच्या नावाखाली ‘शोले’ आणि ‘सुहाग’सारख्या चित्रपटांवरही या अस्त्राचा वापर केला; पण तो निष्प्रभ ठरला. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले काही विशिष्ट गट धर्माच्या नावाखाली प्रेक्षकांना भडकावण्याचे काम करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात असलेल्या काही गटांचाही यात समावेश असल्याचे चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांचे मत आहे. 

रणबीर कपूरच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांना आवडते तेच ते स्वीकारतात. ‘शमशेरा’ न आवडल्याने त्यांनी नाकारला. चित्रपट हिट किंवा फ्लॉप करणे प्रेक्षकांच्या हाती असल्याचेही रणबीर म्हणाला होता. कंटेंट चांगला असेल, तर प्रेक्षक चित्रपट डोक्यावर घेतात याची खात्रीही रणबीरला आहे. त्यामुळे बॉयकॉट करूनही काही चित्रपटांनी तुफान बिझनेस केल्याची उदाहरणे आहेत. 

माझ्या मते बॅायकाॅटचा अर्थ रागावणे असा आहे. रागावलेल्या व्यक्तीची समजूत काढता येते. आपण जसा विचार करत होता तसा हा चित्रपट नसून, चांगला चित्रपट बनवल्याचे प्रेक्षकांना सांगायला हवे. प्रेक्षक रागावतात तेव्हा त्यांची समजूत काढावी लागते. चित्रपटात जर आक्षेपार्ह गोष्ट नसेल तर रागावलेल्या प्रेक्षकांचा राग आपोआप जातो.    -सुभाष घई,     निर्माते-दिग्दर्शक 

चित्रपट चांगला असेल तर नक्कीच चालतो. ‘ब्रह्मास्त्र’ याचे ताजे उदाहरण आहे. बहिष्काराच्या दबावाखाली ‘ब्रह्मास्त्र’ने केलेला व्यवसाय चांगलाच आहे. त्याचे बजेट खूप आहे; पण केलेली कामगिरी वाईट नाही. आपल्या कलाकृतीचा समाजाला त्रास होऊ नये याकडेही लक्ष द्यायला हवे. -महेश मांजरेकर दिग्दर्शक-अभिनेते

टॅग्स :लाल सिंग चड्ढासोशल मीडिया