लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील रिफायनरीपासून निघून मनमाडमधील इंधन केंद्रापर्यंत जाणाऱ्या आपल्या २५२ किलोमीटर लांबीच्या, १८ इंची व्यासाच्या पाईपलाईनचा ४८ किलोमीटरचा भाग दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आला आहे, अशी माहिती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे देण्यात आली. बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरीसाठी ही पाईपलाईन जीवनवाहिनी ठरली आहे. कारण याच पाईपलाईनमधून रिफायनरीद्वारे निर्मित ८० टक्के डिझेल व पेट्रोलचे वितरण होते.
२० वर्षांपूर्वी या कंपनीने पाईपलाईन टाकली, तेव्हापासून आतापर्यंत पाईपलाईनच्या भोवताली पायाभूत सुविधांचा विकास झाला असून अनेक निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे पाईपलाईनची दुरुस्ती करणे दुरापास्त झाले होते, तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला होता. बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरीद्वारे उत्पादित डिझेल व पेट्रोलच्या ८० टक्क्यांहून अधिक इंधन याच पाईपलाईनमधून वितरित करण्यात येत असल्यामुळे, ही पाईपलाईन या रिफायनरीसाठी खरोखरच एक जीवनवाहिनी ठरली आहे. ही मुंबई-मनमाड पाईपलाईन गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा या प्रदेशांतून दिल्लीपर्यंत नेण्यात आली आहे. पाईपलाईन अन्य मार्गाने वळविण्यास ४५० कोटी रुपयांचा खर्च आला.
--------------------------------------------