बीपीटीची अग्निसुरक्षा वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 05:56 AM2018-09-17T05:56:18+5:302018-09-17T05:57:48+5:30
७४ रिक्त पदे रिक्त; अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक बोजा
- खलील गिरकर
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमबीपीटी) मधील अग्निसुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, बीपीटीमधील अग्निसुरक्षा धोक्यात आली आहे. बीपीटीमध्ये केमिकल जेटी असल्याने, त्या ठिकाणी अग्निशमन दल असणे बंधनकारक आहे. मात्र, या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या बीपीटीमध्ये जवाहर द्वीप, पीरपाव, प्रिन्सेस डॉक, हाजीबंदर या ठिकाणी बीपीटीचे अंतर्गत अग्निशमन दल कार्यरत आहे. येथे ७४ पदे रिक्त आहेत. सध्या काम चालविण्यासाठी विद्यमान कर्मचारी व अधिकाºयांना अतिरिक्त काम करायला सांगतात.
६ आॅक्टोबर २०१७ रोजी जवाहर द्वीप येथे लागलेल्या आगीमुळे मुंबई शहराला मोठा धोका निर्माण झाला होता. पीरपाव ही केमिकल जेटी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल व आॅइल भरलेल्या बोटी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाचे जास्त महत्त्व आहे. मात्र, रिक्त पदांमुळे येथे अतिरिक्त कार्यभारावर अवलंबून राहावे लागत आहे.
मागणी करूनही भरती नाहीच
या रिक्त पदांवर कामगारांची कायमस्वरूपी भरती होईपर्यंत ७२ जणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या भरतीमध्ये पोर्ट ट्रस्टच्या विद्यमान व निवृत्त कामगारांच्या पाल्यांना प्राधान्याने संधी द्यावी, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनचे सचिव मारुती विश्वासराव व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्याकडे यापूर्वी केली आहे. भाटिया यांनीदेखील केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस केली आहे. मात्र, अद्याप त्यावर अंमलबजावणी होऊन भरती झालेली नाही. लवकरात लवकर याची अंमलबजावणी व्हावी व अग्निसुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी कामगारांमधून करण्यात येत आहे.