Join us  

मेंदूचे हाड काढून पुन्हा बसवले... २२ वर्षीय तरुणीला जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 8:08 AM

क्रॅनिओटॉमीनंतर १५ सेंटिमीटरच्या ब्रेन ट्युमरवर मात

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिक येथील २२ वर्षीय अर्चनाला डोकेदुखीचा त्रास होत होता, तिला चक्करही आली.  त्या समस्येवर तात्पुरती औषधे सुरू केली. मात्र, नर्तिका असणारी अर्चना एकदा नृत्य सादर करत असताना बेशुद्ध पडली. तिला स्थानिक रुग्णालयात नेले असता, ब्रेन ट्युमरचे निदान झाले. या गंभीर आजाराच्या निदानानंतर तिच्या मेंदूतील हाड काही काळ काढून पुन्हा बसविण्यात आले. तब्बल एक महिन्याच्या व्हेंटिलेटर सपोर्टनंतर आता ती पुन्हा सामान्यपणे जीवन जगू लागली आहे, तिने पुन्हा नृत्याचा सराव सुरू केला आहे.

अर्चनाच्या मेंदूच्या मध्यवर्ती भागात १५ सेंटिमीटर ब्रेन ट्युमरच्या क्रॅनिओटॉमीनंतर तिला जीवनदान मिळाले आहे.  तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांव्यतिरिक्त दृष्टीत अडथळाही जाणवत होता. तसेच चालण्यातही अडचण येऊ लागली. ट्युमरच्या गुंतागुंतीच्या स्थितीमुळे स्थानिक रुग्णालयांनी कोणतीही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. तिला एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी रुग्णालयाचे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. विवेक अग्रवाल यांनी सांगितले की,  तिची शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली. ट्युमरला रक्तपुरवठा अधिक  होत असल्याने खूप रक्त कमी झाले होते. तिच्या मेंदूला सूज आली होती, रक्तस्त्राव झाले होते. त्यामुळे त्यांनी कमी वेळेत शस्त्रक्रिया होईल, असा मार्ग निवडला. मेंदूतील दाब कमी करण्यासाठी तिच्या कवटीचे हाड एका महिन्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये काढून ठेवले आणि जतन केले. एका महिन्याच्या व्हेंटिलेटर आणि रक्त संक्रमणानंतर तिला एका बाजूला अर्धांगवायू होताना पुन्हा शुद्ध आली. तिच्या अशक्तपणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि ती सुधारू लागली, त्यानंतर ते हाड तिच्या कवटीत पुन्हा बसविण्यात आले. 

क्रॅनिओटॉमी म्हणजे काय? मेंदूच्या ज्या भागावर ऑपरेशन करायचे आहे, त्या भागाच्या डोक्याचा हाडाचा एक तुकडा काढून मग शस्त्रक्रिया केली जाते. पण यामुळे कधी-कधी काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.  मेंदू हा भाग खूप संवेदनशील असल्याने इतका मोठा धोका पत्करणे खूप घातक होऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये की होल किंवा मिनिमली इन्व्हेझिव्ह ऑपरेशनमुळे मॅलिग्नंट ब्रेन ट्युमर काढता येतो.  यामुळे मेंदूचे आवरण किंवा कवटीला धक्का न लावता किंवा आपसापच्या पिच्युरी ग्लॅन्ड किंवा अन्य भागाला धोका निर्माण न करता हे केले जाते.

टॅग्स :नाशिकहॉस्पिटल