भाईंदर - विरार येथे राहणारा २७ वर्षीय तरुण कुटुंबीयांसोबत पिकनिकला गेला असताना ब्रेन हॅमरेजमुळे बेशुद्ध झाल्यामुळे त्याला मीरा रोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्राव जास्त झाल्याने २२ नोव्हेंबरला त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. रुग्णालयाच्या अवयवदान पथकाने या तरुणाच्या पालकांना अवयव दानाचे महत्व पटवून दिले. त्याला प्रतिसाद देत त्यांनी आपल्या मुलाचे अवयवदान करण्यास तयारी दर्शविली.आपला तरुण मुलगा जाण्याचे दु:ख असूनही त्याच्या वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे रुग्णालयाचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. या तरुणाच्या अवयव दानामुळे चोघांना जीवनदान मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. या तरुणाचे हृदय ६३ वर्षीय जेष्ठ नागरिकाला मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले तसेच त्याचे यकृत ५३ वर्षीय रुग्णाला देण्यात आले असून त्याचेही प्रत्यारोपण फोर्टिस हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. या तरुणाची एक किडनी मीरा रोड वोक्हार्ट हॉस्पिटमध्ये ४२ वर्षीय महिलेला प्रत्यारोपित करण्यात आली व दुसरी किडनी केइएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आली अशी माहिती झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेन्टर म्हणजेच झेडटीसीसी तर्फे देण्यात आली. या वर्षात आतापर्यंत एकूण १२७ कॅडव्हर म्हणजेच ब्रेन डेड झालेल्या पेशंटचे अवयवदान झाले असून यामध्ये ६७ किडनी, ३९ यकृत, १६ हृदय तसेच ५ फुफ्फुसे प्रत्यारोपित करण्यात आल्याची माहिती सुद्धा हिरवानी यांनी दिली.
ब्रेनडेड तरुणामुळे चौघांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 8:56 PM