Join us

ब्रेनडेड महिलेने दिले तिघांना जीवनदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:28 AM

रत्नागिरीच्या ४५ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा त्रास होता. अचानक डोकेदुखी सुरू झाल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले.

मुंबई : रत्नागिरीच्या ४५ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा त्रास होता. अचानक डोकेदुखी सुरू झाल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर अंधेरीतील एका प्रख्यात रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, अचानक त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव झाल्याने त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाइकांकडे अवयवदान करण्याची परवानगी मागितली. पत्नीच्या मृत्यूनंतर तिचे अवयव अन्य गरजू व्यक्तीला नवे जीवन देऊ शकतात, या विचाराने त्यांच्या पतीने तत्काळ होकार दिला.अवयवदानाची परवानगी मिळताच डॉक्टरांनी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला माहिती दिली. त्यानुसार त्या महिलेचे यकृत आणि मूत्रपिंड दान केले. त्यांचे यकृत एका खासगी रुग्णालयातील व्यक्तीला दान करण्यात आले, तर एक मूत्रपिंड झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार त्याच रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या एका व्यक्तीला आणि दुसरे मूत्रपिंड खंबाला हिल येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.या महिलेच्या कुटुंबीयांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे तिघा जणांना जीवनदान मिळाले आहे.>उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने आणि डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्याने डॉक्टरांनी ७ एप्रिलला रात्री अडीच वाजता त्या महिलेला ब्रेनडेड घोषित केले. अवयवदानाबाबत त्यांच्या कुटुंबीयांना समज होती. त्यामुळे त्यांनी तत्काळ होकार दिला.- डॉ. रेखा बारोत